Narendra Modi News, Uddhav Thackeray News sarkarnama
मुंबई

नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर : भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष!

राज्यातील भाजप आणि शिवसेनेच्या नात्यात आलेली कटुता पाहता या दोघांचे एकत्र येणे महत्वाचे आणि चर्चेचे ठरत आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या (ता. १४ जून) अनेक महिन्यांनंतर एकाच मंंचावर एकत्र येत आहे. मुंबईतील राजभवनामधील क्रांतिकारी गॅलरीचे उद्‌घाटन उद्या मोदींच्या हस्ते होणार आहे, त्या कार्यक्रमास मुख्यमंत्री ठाकरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यातील भाजप (BJP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) नात्यात आलेली कटुता पाहता या दोघांचे एकत्र येणे महत्वाचे आणि चर्चेचे ठरत आहे. (Narendra Modi-Uddhav Thackeray will come on the one platform)

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मोदी यांच्या हस्ते सकाळी देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. त्यानंतर राजभवनावर गॅलरी उद्‌घाटनाचा दुसरा कार्यक्रम असणार आहे. (Uddhav Thackeray News)

विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडले होते. त्या भुयारामध्ये एक गॅलरी स्थापन करण्यात आली, त्यामध्ये चाफेकर आणि सावरकार बंधू यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. या गॅलरीचे उद्‌घाटन उद्या दुपारी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही, अशी चर्चा सुरु असतानाच ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे, त्यामुळे अनेक महिन्यांनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला होता, त्या कार्यक्रमास जाणे उद्धव ठाकरे यांनी टाळले होते. त्याऐवजी त्यांनी जुन्या शिवसैनिक, मातोश्रीसमोर आंदोलन करणाऱ्या आजींना भेटणे पसंत केले होते. त्या पार्श्वभूमीवर या दोघांमध्ये दुरावा आहे की काय, अशी चर्चा रंगली होती. त्यामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली भेट दिल्लीत झाली होती. त्या भेटीची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण त्यावेळी सोबत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वगळून या दोघांमध्ये स्वतंत्र चर्चा झाली होती. त्यानंतर मात्र राज्यातील भाजप नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांचे एकत्र येणे चर्चेचे ठरले आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर नव्या मित्रांबाबत शिवसेनेत वेगळी चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT