Navneet Rana | Ravi Rana | Dilip Walse Patil
Navneet Rana | Ravi Rana | Dilip Walse Patil Sarkarnama
मुंबई

घडामोडींना वेग : राणा दाम्पत्य नजरकैदेत; वळसे पाटील दौरा सोडून मुंबईकडे रवाना

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर जाऊन हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) वाचण्यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा संघर्ष पेटला आहे. शिवसेना आणि शिवसैनिकांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी मातोश्रीबाहेर जाणारच असा ठाम निर्धार अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बोलून दाखवला आहे. राणा यांच्या या इशाऱ्यानंतर त्यांच्या शिवसेना अधिक आक्रमक झाली असून संतप्त शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याच्या घराबाहेरचे बॅरिकेट्स तोडून घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

शिवसैनिकांच्या या कृतीनंतर पोलिसांनी सध्या राणा दाम्पत्याला घरातच नजरकैदेत ठेवलं असून १० ते १२ वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि इतर पोलिस असा मोठा फौजफाटा त्यांच्या घरामध्ये तैनात करण्यात आला आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणावरील पोलिस बंदोबस्त राणा यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आला आहे. नवनीत राणा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेर न पडण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही त्यांनी भूमिका न बदलल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्याला नजरकैदेमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसची संवाद यात्रा दौरा सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. वळसे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांनी काही आरोप देखील केले आहेत, हे कोणाच्या तरी सांगण्यावरून सुरू आहे. राणा दाम्पत्याने कोणाची तरी सुपारी घेतली असावी. समाजात असंतोष निर्माण करण्याचे हे कृत्य आहे.

तसेच राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे हे दाखवण्याचा त्यामागचा उद्देश आहे, असा आरोपही वळसे पाटील यांनी केला आहे. वळसे पाटील यांनी यावेळी राणा दाम्पत्याला काही सल्ले देखील दिले आहेत. ते म्हणाले, गेले २-३ दिवस विनाकारण हा मेलोड्रामा सुरू आहे, पण काय करायचं ते आपापल्या घरी करा. पुढे काय करायचे पोलिसांना माहिती आहे. विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढावून घेऊ नका. दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करण्याची गरज नाही असाही सल्ला वळसे पाटील यांनी राणा दाम्पत्याला दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT