Nawab Malik and Sameer Wankhede
Nawab Malik and Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

समीर वानखेडे शाळेच्या दाखल्यात मुस्लिमच! मलिकांचे उच्च न्यायालयात पुरावे

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (N awab Malik) यांनी केला आहे. मलिक यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वानखेडेंचा शाळेचा प्रवेश अर्ज आणि शाळा सोडल्याचा दाखला याचीही कागदपत्रे मलिक यांनी दिली आहेत.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी आज उच्च न्यायालयात आणखी कागदपत्रे सादर केली. मलिक यांनी आज प्रतिज्ञापत्रही सादर केले असून, त्यात समीर वानखेडे यांचा शाळा प्रवेशाचा अर्ज आणि प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखलाही आहे. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. मलिक यांच्या वकिलांनी न्यायाधीश माधव जमादार यांच्यासमोर हे म्हणणे मांडले. यावर उद्या दुपारी 2.15 वाजता सुनावणी होणार आहे.

वानखेडे यांनी नुकतीच दिल्लीत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांची भेट घेतली होते. वानखेडे यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे आयोगासमोर सादर केली आहेत. यानंतर बोलताना आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला म्हणाले होते की, समीर वानखेडे यांनी आयोगाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी महाराष्ट्र सरकार करणार आहे. ही कागदपत्रे वैध आढळल्यास त्याआधारे त्यांच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही.

समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सार्वजनिक केला होता. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांनी नुकतीच राष्ट्रीय अनुसूचित आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांची भेट घेतली. त्यांनी हलदर यांच्याकडे एक अर्जही केला होता. यानंतर हलदर यांनी वानखेडे यांना लगेचच क्लिनचिट दिली होती. हलदर म्हणाले होते की, मी त्यांची तक्रार पाहिली आहे. मला वाटते की ते अनुसूचित जातीमधील असावेत. धर्मांतर केल्याचे सर्व आरोप वानखेडेंनी फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT