Sameer Wankhede
Sameer Wankhede Sarkarnama
मुंबई

समीर वानखेडेंचा पाय खोलात; राज्य उत्पादन शुल्क विभागाने आवळला फास!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) रडारवर आले आहेत. मुंबईत वानखेडे यांचा एक रेस्ट्रो बार आहे. वानखेडे यांनी अल्पवयीन असताना या बारचा परवाना घेतला होता. या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि ठाण्याचे उत्पादन शुल्क अधीक्षक यांच्याकडून माहिती मागवली आहे. यामुळे वानखेडे यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

नवी मुंबईत सद्गुरू नावाने हा रेस्ट्रो बार आहे. समीर वानखेडे यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात होते. वाशी येथे 1997-98 मध्ये सद्गुरू रेस्ट्रो बार सुरू करण्यात आला. त्याचा परवाना 27 ऑक्टोबर 1997 रोजी समीर वानखेडे यांच्या नावाने घेण्यात आला. त्यावेळी वानखेडे यांचे वय 17 वर्षे 10 महिने होते. हा परवाना 2022 पर्यंत वानखेडे यांच्या नावावर आहे. बारचा परवाना मिळवण्यासाठी वयाची अट 21 वर्षे आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांकडे हे नेमके कसे घडले याविषयी विचारणा करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अहवाल मिळाल्यानंतर वानखेडे आणि त्यांना परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

याबाबत मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, कमी वयाच्या मुलाच्या नावाने परवाना घेण्यात आला. 18 वर्षाच्या खालील लोकांना परवाना दिला जात नाही. शासकीय अधिकारी शासन नोकरी करत असताना व्यवसाय करू शकत नाही. हा नियमभंग आहे. आता तरी त्यांच्यावर कारवाई करावी. त्यांना अजून वाचवलं तर केंद्र आणि भाजप त्यांना वाचवत आहे, असा त्याचा अर्थ होईल.

दरम्यान, अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या मुंबईतील प्राथमिक शाळेचे दोन दाखले सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. या दोन्ही दाखल्यांवर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद आणि धर्म मुस्लिम असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आणि वडिलांचे नाव दाऊद असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT