Sameer Wankhede  sarkarnama
मुंबई

जात प्रमाणपत्राबाबत समीर वानखेडेंचीच कबुली; समितीकडे मागितला आणखी वेळ

वानखेडे यांनी नोकरीसाठी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याची तक्रार जातपडताळणी समितीकडे करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर आता वानखेडे यांनीच आपल्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्याची कबुली दिली आहे.

मुंबईच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी वानखेडे यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. पण वानखेडे यांच्या वकिलांनी हे प्रमाणपत्र नसल्याचे समितीला सांगितले. तसेच कागदपत्रे सादर करण्यासाठी समितीकडे आणखी वेळ मागितला. त्यानुसार आता समितीने १८ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.

दरम्यान, बारामती येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव (Nitin Yadav) यांनी मुंबई शहर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे याबाबत अर्ज केला होता. यादव यांनी समीर वानखेडे या नावे देण्यात आलेले जात पडताळणी प्रमाणपत्र व सोबत त्या नावे जात पडताळणीसाठी जे कागदपत्रे जमा करण्यात आली आहेत, त्या सर्वांची साक्षांकित प्रत मिळण्याची मागणी माहिती अधिकार अर्जात केली होती.

त्यावर समितीने प्रमाणपत्र जारीच केले नसल्याचे म्हटले आहे. कार्यालयातील उपलब्ध अभिलेख तपासला असता समीर वानखेडे या नावे जात पडताळणी प्रमाणपत्र जारी करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे, असं उत्तर समितीकडून यादव यांना देण्यात आले आहे. समितीच्या या खुलाशामुळे पुन्हा एकदा वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत त्यांना प्रत्यक्ष हजर राहण्यास समितीने बजावले होते. परंतु, त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने हजेरी लावली. वानखेडे यांना जात प्रमाणपत्राची सत्यता सिद्ध करण्यासाठी आणखी कालावधी द्यावा, अशी मागणी वकिलांनी याआधीच्या सुनावणीवेळी समितीला केली होती. वानखेडे यांच्या उपस्थितीची आवश्यकता नसल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. या प्रकरणी 28 डिसेंबरला सुनावणी ठेवण्यात आली होती. आम्ही जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी काही अवधी मागितला असून, ते पुढील काही दिवसांत सादर करू, असेही त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केले होते. पण मंगळवारीही त्यांना प्रमाणपत्र सादर करता आले नाही.

वानखेडे यांचा जातीचा मिळालेला किंवा घेतलेला खोटा दाखला चौकशी करुन रद्द करावा व त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे अशोक कांबळे यांनी केली आहे. वानखेडे यांचे जन्मदाखला, जात प्रमाणपत्र, याबाबत न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीची कागदपत्रे सातपुते यांनी समितीसमोर यापूर्वीच मांडली आहेत. तसेच आणखी काही पुरावे पुढील सुनावणीच्या वेळी देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT