Mumbai News : महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय पक्ष, नेतेमंडळी, मतदारांची परीक्षा पाहणारी निवडणूक यंदा होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आपपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजूंनी सत्ता काबीज करणार असल्याचा दावा केला आहे.
पण तरीदेखील निकालानंतर महाराष्ट्रात नेमकं काय चित्र असेल याबाबतचा अंदाज बांधण्याचं धाडस आजमितीला कुणीही दाखवताना दिसून येत नाही. यंदाची विधानसभा निवडणूक (Assembly Election) निश्चितच कुणासाठीही सोपी राहिलेली नाही.
महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगणं राजकीय जाणकरांसाठीही सध्या आव्हानात्मक झालं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं चांगलीच बदलली आहे. अनेक शिवसेना -काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीचा राजकीय प्रयोग अस्तित्वात आणला तसाच तो यशस्वीही करुन दाखवला.
त्यानंतर 2022 ला महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजप -शिंदे शिवसेना यांची युती जुळून आली आणि सत्ता पालटली.त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे कुणाच्या मनीध्यानी नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. कोणतीही विचारधारा जुळून येत नसताना अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय राजकीय समीकरणांना कलाटणी देणारा ठरला.
निवडणुकीआधी कितीही एकत्रितपणे निवडणुक लढण्याचे अन् जिंकून सत्तेत परतणार असल्याच्या आणाभाका महाविकास आघाडी आणि महायुतीकडून घेतल्या जात असल्यातरी 2024 च्या निकालानंतरही महाराष्ट्रात काहीही घडू शकते अशी चर्चा व्यक्त होऊ लागली आहे.
भाजपचा तीव्र विरोध पत्करुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नवाब मलिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्याच मलिकांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार विधानसभा निवडणुकीनंतर किंगमेकर ठरतील असं भाकित वर्तवतानाच निकालानंतर काहीही घडू शकते असं विधान केले होते. मात्र,आता परत एकदा राष्ट्रवादीच्या अजित पवार पक्षाच्या एका नेत्याच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महायुती सरकारमधील सहकारमंत्री मंत्री व आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठं विधान केलं आहे, ते म्हणाले, आत्ताच पुढचं काही सांगणं कठीण आहे. तसेच निकालानंतर बहुमताचं गणित जुळत नसेल तर सरकार आणण्यासाठी नवी समीकरणं जुळवावीच लागणार आहे.
काही ना काही करावे लागेल. 6 पक्ष आहेत. केवळ 2-3 पक्ष नाहीत. त्यामुळे 6 पक्षांचं गणित जुळवण्यासाठी भरपूर वाव आहे असं सूचक विधान दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे एकीकडे आघाडी तर दुसरीकडे युती आहे.दोन्ही बाजूला 3-3 पक्ष आहेत.
उद्या आघाडी सरकार येते की युती सरकार हे थोडावेळ बाजूला ठेवू, पण प्रत्येक पक्षाचे किती आमदार निवडून येतील हे पाहावे लागेल. त्यानंतर त्याचे खरे गणित जुळवले जाईल. त्यात कदाचित निवडणुकीच्या निकालानंतर काही समीकरणे बदलूही शकतात असंही त्यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघाचे उमेदवार नवाब मलिक यांनी 2019 च्या निकालानंतर काय घडेल याचा अंदाज कुणी बांधला होता का? असा सवाल करतानाच २०२४ च्या निकालानंतरदेखील राज्याच्या राजकारणात काही घडू शकते.पण अजित पवार हे सत्तेच्या खेळात किंगमेकर राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.
तसेच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपाचेच सरकार येईल किंवा अजित पवार भाजपाबरोबरच असतील,हे आताच सांगणे कठीण आहे. या निकालानंतर कोण कोणाच्या बरोबर असेल हे सांगताच येत नाही. आता काही लोक सांगत आहेत की, एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचे काही तरी चालले आहे. अशी वेगवेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे असाही गौप्यस्फोट त्यांनी यावेळी केला होता.
आपण जास्त भविष्यवाणी करू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला चांगल्या जागा मिळतील. आताच्या घडीला ही लढाई काटे की टक्कर अशी आहे. मोठा संघर्ष होणार आहे. सरकार कुणाचं येईल असा दावा कुणी करू शकत नाही. प्रचार जसजसा पुढे सरकत जाईल त्या परिस्थितीनुसार पुढे बघू असं असं विधान नवाब मलिकांनी केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.