Anand Paranjpe, Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

Thane Politics : आनंद परांजपे यांनी आव्हाड यांना सुनावले; ज्या शिवसेनेला विरोध केलात आता त्यांचेच...

Pankaj Rodekar

Thane Political News :

शरद पवारसाहेबांच्या सहमतीने एखादा निर्णय झाला की, तो साहेबांचा आशीर्वाद पण अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली की ती गद्दारी? डॉ. जितेंद्र आव्हाड यांची गद्दारीची नक्की व्याख्या काय? हा सवाल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी. त्याचवेळी ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध जितेंद्र आव्हाड यांनी केला, त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. याचे आव्हाडांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकशाही मार्गाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) दिला आणि चिन्हही दिले. मग जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) एवढी आगपाखड का करतात, असा सवाल आनंद परांजपे (Anand Paranjpe) यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र विधिमंडळातून प्रतिक्रिया देताना म्हटले की, शरद पवारसाहेब (Sharad Pawar) यांच्याशी आम्ही गद्दारी केली. आम्ही त्यांचा पक्ष हिसकावून घेतला, चिन्ह हिसकावून घेतले, कार्यालय देखील आम्ही घुसून ताब्यात घेणार आहोत. माझा त्यांना सरळ प्रश्न आहे की पवारसाहेबांच्या आशीर्वादाने, सहमतीने 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीची आकडेवारी येत असताना आम्ही बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता याला काय म्हणायचे?

2016, 2018, 2019 मध्ये अनेक बैठका भाजपच्या शीर्ष नेत्यांबरोबर झालेल्या आहेत. साहेबांच्या सहमतीने आणि आशीर्वादाने या बैठका झाल्या होत्या, याला काय म्हणायचे? ज्या आव्हाड यांनी स्वतः सामना पेपर जाळला, शिवसेनेविरूद्ध आंदोलने केली त्याच शिवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीच्या (MVA) सत्तेत 2019 मध्ये सामील झाले. याला काय म्हणायचे? असे अनेक सवाल आनंद परांजपे यांनी उपस्थित केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'हे जितेंद्र आव्हाड विसरले'

कळव्याची शिवसेनेची शाखा असेल, खारीगावची शिवसेनेची शाखा असेल, या शाखा कोणामुळे तुटल्या? हे बहुतेक जितेंद्र आव्हाड विसरले असतील! ज्या शिवसेनेचा प्रखर विरोध आव्हाडांनी केला त्याच शिवसेनेचे गोडवे सध्या ते गात असतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक विरोध त्यांनी किती वेळा केला आणि कालच प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे किती गोडवे त्यांनी गायले हे सगळ्या ठाणेकरांना माहीत आहे. यामुळेच गद्दारीची व्याख्या काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान परांजपे यांनी आव्हाडांना दिले.

आमचे आमदार अपात्र नाहीत

2 जुलै 2023 रोजी आम्ही शपथ घेतली. त्यावेळी रात्री 2 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे अपात्रतेची पिटीशन टाकलीत. निवडणूक आयोगासमोर दोन-तीन महिने सुनावणी झाली. त्याच्यानंतर पक्ष व चिन्ह याचा निकाल आमच्या बाजूने लागला, लोकशाही मार्गाने केंद्रीय निवडणूक आयोगाने आम्हाला पक्ष दिला, चिन्ह दिले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी आमच्या बाजूने निर्णय दिला आणि आमचा एकही आमदार अपात्र झालेला नाही. तुमचे कार्यालय ताब्यात घेण्याचा कुठलाही विचार झालेला नाही. ते कार्यालय तुम्हाला सरकारने दिले आहे. आम्हालाही सरकारने कार्यालय दिले आहे आणि आमच्या पक्षाचे कामकाज प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टरित्या सुरू आहे, असे शेवटी परांजपे यांनी स्पष्ट केले.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT