Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

बाप दाखव नाहीतर श्राध्द कर! शरद पवार कडाडले

इतिहासकाराने सबळ पुराव्याआधारे न लिहिता ऐकीव व तार्किक माहितीआधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे, असं पवार म्हणाले.

सरकारनामा ब्युरो

उदगीर : राज्यात मागील काही दिवसांपासून जेम्स लेनच्या पुस्तकावरून पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी 95 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात कडाडले. इतिहासकाराने सबळ पुराव्याआधारे न लिहिता ऐकीव व तार्किक माहितीआधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर!’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा, अशा शब्दांत पवारांनी संबंधितांचे कान टोचले.

पवारांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर केलेल्या भाषणादरम्यान पवारांनी विविध मुद्दांकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले, मला साहित्यात संशोधनात्मक लिखाणाची वानवा जाणवते. संशोधनात्मक लिहिले जात असेल परंतु ते वाचकांपर्यंत पोहचत नसावे. विशेषत: ऐतिहासिक लिखाणात सखोल संशोधन व अभ्यास आवश्यक असतो. इतिहासकाराने सबळ पुराव्याआधारे न लिहिता ऐकीव व तार्किक माहितीआधारे लिहिणे हा मोठा प्रमाद आहे. तो अनेक दीर्घकालीन वाद-विवादांना जन्म देतो. असे लेखन वेळीच रोखले पाहिजे. नाहीतर जनमानसात त्या चूका मूळ धरू लागतात आणि ठाण मांडून बसतात. अशा वृत्तींना ‘बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर!’ असा रोखठोक सवाल विचारावयास हवा.

कयास आणि कल्पनाविलास करण्यासाठी इतर फिक्शनल साहित्य प्रकार आहेत. अशा प्रवृत्तींच्या लेखकांनी त्यासाठी लेखणी पाजळावी, असंही पवारांनी सुनावलं. मराठीत पी.एच.डी. करताना विषय देखील संशोधनायोग्य असावा. संदर्भग्रंथांचे संकलन करून प्रबंध केलेले पाहावयास मिळतात. सखोल संशोधनाचा त्यात अभाव आढळतो. विद्यापीठांना विनंती आहे की, पी.एच.डी.साठी विषय देताना तो संशोधनक्षम असावा केवळ संकलनक्षम नसावा याची दक्षता घ्यावी. सखोल संशोधनानंतर निर्माण झालेले साहित्य माहितीचे नवे भांडार ठरू शकते, असं पवारांनी नमूद केलं.

साहित्यात विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा

समाजकारणी आणि राजकारणी यांच्या साहित्यातून विचारधारा जन्माला आली आणि विचारधारेतून अनेक वाद जन्माला आले. जसे की, गांधीवाद, मार्क्सवाद, आंबेडकरवाद, समाजवाद, राष्ट्रवाद वगैरे! परंतु आजकाल ठरावीक विचारधारेला पोषक साहित्यनिर्मितीवर काही घटक भर देत आहेत. ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. प्रोपागंडा साहित्य निर्मिती ही निरंकुशतेला निमंत्रण देते आणि अराजकता ओढवते. हिटलरने ‘माईन काम्फ’ पुस्तक आणि इतर माध्यमांद्वारे केलेला प्रोपागंडा ( मतप्रचार ) हे त्याचे भयानक उदाहरण आहे. आपल्या देशात देखील असा विशिष्ट विचारधारेचा प्रोपागंडा फैलावताना दिसत आहे, अशी भीती पवारांनी व्यक्त केली.

साहित्यिकांनी आणि साहित्य रसिकांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहावे. साहित्य हे मुक्त असावे असे मी म्हटले. याचा अर्थ ते कोणत्याही विचारधारेला बांधील नसावे. कारण अशा बांधिलकीतून मतप्रणाली तयार होते. ती बुद्धिभेद करणारी, ध्रुवीकरण करणारी, विषारी स्वरूपाची आणि राष्ट्रहिताला बाधा आणणारी असू शकते. साहित्यिकांनी समान अंतरावर राहून त्याकडे त्रयस्थाप्रमाणे पाहावयास हवे. राज्यकर्ते असा प्रोपागंडा (मतप्रचार) थेट करत नाहीत. त्यांनी साहित्य अथवा माध्यमाची कमकुवत अंगे न्याहाळली आहेत. प्रसारमाध्यमांच्या बाबतीत त्यांनी अत्यंत हुशारीने कॉर्पोरेट जगाची मदत घेऊन हा प्रोपागंडा राबवणे सुरू केले आहे. चित्रपट ह्या कलाक्षेत्रात त्याचा उघड-उघड झालेला शिरकाव आपणास दिसतो आहेच. कॉर्पोरेटचे छत्र हे प्रोपागंडाचे अस्त्र होऊ पाहते आहे. हे कॉर्पोरेट जगत साहित्यात आले, तोट्यात असलेल्या प्रकाशन संस्था त्यांनी ताब्यात घेतल्या की, चौथा स्तंभ समूळ कोसळण्यास वेळ लागणार नाही. ह्या धोक्याच्या घंटेकडे मी आग्रहाने आपले लक्ष वेधू इच्छितो.

साहित्यविश्वात राजकारणाचा शिरकाव

साहित्य आणि राजकारण यांचे अतूट नाते असल्याने साहित्यविश्वात देखील राजकारणाचा शिरकाव झाला आहे. विशेषत: संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड निवडणूक पद्धतीने सुरू झाल्यानंतर साहित्यिकांच्या अंतरंगात आमच्यातील राजकारणी घुसू लागला आहे. त्याचा अत्याधिक तोटा महिला साहित्यिकांना संभवतो. आजपर्यंतच्या साहित्य संमेलनांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, पहिले साहित्य संमेलन इ.स.१८७८ मध्ये भरले तरी महिलेला अध्यक्षपदाचा मान मिळण्यासाठी १९६१ साल उजाडावे लागले. श्रीमती कुसुमावती देशपांडे या विदुषीला तो पहिल्यांदा मान मिळाला. त्यानंतर श्रीमती दुर्गा भागवत, कवयित्री शांता शेळके, डॉ. विजया राजाध्यक्ष अशा थोडक्या महिलांना साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविता आले. चक्रधरस्वामींच्या महानुभाव पंथातील आद्य कवयित्री महदंबा ते जनाबाई, मुक्ताबाई तसेच सावित्रीबाई फुले, बहिणाबाई चौधरी, रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक ते अरूणा ढेरे - संजीवनी तडेगावकरांपर्यंत असंख्य महिलांनी मराठी साहित्यात आपला अमीट ठसा उमटवला आहे, असं पवारांनी सांगितलं.

अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रथा असल्याने महिलांसाठी ते अशक्यप्राय होऊ नये असे मला वाटते. महामंडळाने निवडणूक पद्धतीत एखादे महिला समावेशक धोरण आणले तर त्याचे प्रथम स्वागत मी करेन. मला वाटते महामंडळाच्या घटनेत सुधारणा करून संमेलनाच्या अध्यक्षपदी दर पाच वर्षांतून किमान एकदा तरी महिलाध्यक्ष नियुक्त व्हावी अशी तरतूद व्हावी, अशी अपेक्षा पवारांनी व्यक्त केली. आज महिला धोरणाचा पुरस्कर्ता म्हणून मी येथे उभा राहिलो याची चर्चा साहित्य संमेलनात झाली तर त्याचा मला आनंदच आहे, असं पवारांनी नमूद केलं.

आजच्या उद्घाटनप्रसंगी मी स्पष्ट बोललो. परंतु ज्ञानगंगेचा प्रवाह कोणत्या दिशेला जाऊ शकतो हे माझ्या मनाला जाणवले आणि बुद्धीला पटले म्हणून लोकशाहीच्या एका स्तंभाचा पाईक या नात्याने आपल्यापुढे माझी भूमिका मांडली. साहित्य संमेलनाचा एक हेतू विचारांचे अभिसरण आणि जनजागरण हा देखील असतो. मी ते कर्तव्यभावनेने केले आहे. साहित्य संमेलनात अनेक वाद-परिसंवाद रंगतील, काव्याच्या मैफली बसतील, लोकरंजनाचे कार्यक्रम होतील. मला खात्री आहे की, सारस्वतांचा हा मेळावा देखील साहित्यरसिकांच्या मनावर आपला ठसा उमटवील, अशी अपेक्षा व्यक्त करत भाषणाचा शेवट केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT