Congress On NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या मंत्र्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सलग दोन दिवस भेट घेतली. या दोन्ही भेटीत पवार यांनी बंडखोर नेत्यांना कोणताही प्रतिसाद दिला नाही. या भेटीने मात्र राज्याच्या राजकारणात पुन्हा खळबळ उडाली. तर महाविकास आघाडीत अस्वस्थता पसरली. बंडखोरांनी शरद पवार यांची घेतलेली भेट पटलेली नाही, अशी नाराजी काँग्रेस नेत्या तिवसाच्या आमदार यशोमती ठाकरू यांनी व्यक्त केली. यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला. (Latest Political News)
अजित पवार यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांनी रविवारी (ता. १६) सायंकाळी आणि सोमवारी (ता. १७) दुपारी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी भेट घेतल्याचे अजित पवार गटाकडून वांरवार सांगितले जात आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले, "पवार हे पक्षाचे नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठीच आम्ही त्यांच्या भेटी घेतल्या आहेत." यावेळी तटकरे यांना राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या भेटीमुळे यशोमती ठाकूर यांच्या नाराजीबाबत छेडले. यावेळी तटकरे यांनी ठाकूर यांच्यासह काँग्रेसचाही समाचार घेतला.
सुनील तटकरे म्हणाले, "त्यांना काय पटते आणि काय पटू नये, याच्याशी आमचे काही देणेघेणे नाही. आम्ही आमचा पक्ष, आमचे राजकीय कुटुंब याचा विचार आम्ही करू. काँग्रेसमधील असलेल्या वेगवेगळ्या प्रवाहाबाबत मलाही खूप काही बोलता येईल. मात्र मला त्याबाबत काही बोलायचे नाही. प्रत्येक पक्ष, प्रत्येक पक्षाची रचना, प्रत्येक पक्षाचा कौटुंबिक परिवार हा वेगवेगळा राहू शकतो. त्यामुळे आम्ही काय करतो यावर टीका, टिपण्णी करण्याचा इतर कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांना नाही."
बंडखोरांनी घेतलेल्या दोन्ही बैठकांनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, "भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. लोक येऊन भेटले तरी भूमिकेत बदल होणार नाही. आपण ज्या पक्षाच्या विरोधात लढलो, त्यांच्यासोबत जणार नाही." असे असले तरी अजित पवार यांच्या गटाने सलग दोन दिवस पवारांच्या घेतलेल्या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं शिजतंय तरी काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.