मुंबई : विधान परिषदेसाठी उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची किमान 9 मत फोडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कामाला लागले असून भाजपमधील काही खडसे समर्थक आमदारांना संपर्क सुरु असल्याची माहिती आहे. त्यामुळे विधान परिषदेला नेमका कोणाचा पराभव होणार हे उद्याच समजून येणार असले तरीही हा पराभव भाजपच्या पाचव्या क्रमांकाचे उमेदवार प्रसाद लाड यांचा होणार का असा सवाल विचारला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेतील प्रतोद अनिल पाटील यांनीही याबाबत माध्यमांशी बोलतान भाष्य केले. ते म्हणाले, भाजपमधील 106 पैकी 60 आमदारांना एकनाथ खडसेंनी जवळून बघितले आहेत. त्यातील सगळ्या खाचाखोचा माहिती आहेत. त्यातील काही आमदार कुठलीही कामे होत नसल्याने आणि देशातील सध्याच्या स्थितीमुळे ते आमच्या संपर्कात आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला मतदान कमी झालेले दिसेल.
दरम्यान, चार उमेदवार निवडून आल्यानंतर भाजपकडे त्यांचे मित्रपक्ष, संलग्न अपक्ष यांची मिळून फक्त पाच मते राहतात. आपला पाचवा उमेदवार अर्थात प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी त्यांना आणखी 21 मतांची बेगमी करावी लागणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत सध्या 53 आमदार आहेत. मात्र आमदार अनिल देशमुख आणि आमदार नवाब मलिक हे कारागृहात असून उच्च न्यायालयाने दोघांनाही मतदानाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांची संख्या 51 वर आली आहे.
विजयासाठीचा कोटा 26 असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला 52 मतांची गरज आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतःचे 51, अपक्ष 3 आमदारांचा पाठिंबा आहे. सोबतच एमआयएमच्या फारुख शहा यांनीही खडसे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे निंबाळकर आणि खडसे यांना आवश्यक मतांसहित अतिरीक्त मतांचाही कोटा पूर्ण झाला आहे. (Vidhan Parishad Election Latest News)
मात्र निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार असल्यामुळे सर्वच पक्षाने खबरदारी घेतलेली आहे. आमदार फुटू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. शिवाय मत बाद होण्याचा देखील धोका असतो, त्यामुळे प्रत्येक पक्ष विजयी कोट्या व्यतिरिक्त काही मत अतिरिक्त देणार आहेत. याच अतिरिक्त मतांच्या कोट्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाजपच्या खडसे समर्थक आमदारांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.