Chhagan Bhujbal sarkarnama
मुंबई

भाजपला आनंद मिळवू देणार नाही : भुजबळांनी ठामपणे सांगितले...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांच्यावर आज सकाळी ईडीने (ED) कारवाई केली. त्यांना दुपारी ईडीने अटक केली. त्यावरुन राष्ट्रवादीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर राजकीय चक्रेही वेगाने फिरली. महाविकास आघाडीने या अटकेचा निषेध करत मलिकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधत, नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. त्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, असे स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आणि मंत्री सुनिल केदार उपस्थित होते.

या वेळी भुजबळ म्हणाले, एकेका मंत्र्याला अडकावयचे आणि राजीनामा द्यायला लावायचा, हा आनंद विरोधी पक्षाला आम्ही मिळवून देणार नाही. दहशतवादाशी संबंधित मलिक यांचे गेल्या तीस वर्षांत कुठे नाव नाही. ते अन्यायाच्या विरोधात बोलतात म्हणून कारवाई होत आहे, असेही भुजबळ म्हणाले. मलिक यांना राजीनामा देण्याजी गरज नाही. अटक झाली, ठीक आहे. जोपर्यंत दोषी आहे हे न्यायदेवता सांगत नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची गरज नाही. केंद्रीय यंत्रणांनी सांगितले म्हणून राजीनामा घ्यावा, हे आम्हाला पटत नाही. जोपर्यंत दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

सलीम पटेल, हसीना पारकर यांचे निधन झाले आहे. वडाची साल पिंपळाला लावायची आणि अटक करायची. तिन्ही पक्ष आणि मंत्र्यांवर दबाव आणायचे काम सुरू आहे. लोकशाहीविरोधात हे सर्व सुरू आहे. लोकशाहीला शोभा देणारे हे नाही. याबाबत पवार साहेब, मुख्यमंत्री बसलो होते. या अन्यायाच्या विरोधात कायदेशीर आणि जनतेच्या न्यायालयात जाऊन लढण्याचे ठरले आहे. मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ मंत्री, आमदार आणि तीनही पक्षांचे कार्यकर्ते धरणे धरून बसणार आहे. परवापासून तीनही पक्षांचे कार्यकर्ते हे जिल्हा, तालुका पातळीवर एकत्रित आंदोलन करणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार कसे पडेल यासाठी हे सारे सुरू आहे, असा आरोपही भुजबळ यांनी केला. भाजपला जे काय करायचे ते करू द्या. पब्लिक सब जानती है, असेही भुजबळ यांनी सांगितले. अनिल देशमुख, संजय राठोड यांच्या राजीनामे झाले ते झाले. आता या परिस्थितीत मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, असी स्पष्टोक्ती भुजबळ यांनी दिला. ममता बॅनर्जी यांचा शरद पवारांना फोन आला. सर्वांनी एकत्रितरित्या या अन्यायाच्या विरोधात लढण्याची भावना त्यांनी व्यक्त केली, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT