Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
मुंबई

हवेवरती पोट भरणारं मशीन येतंय! जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटनं चर्चेला उधाण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे ऐन उन्हाळ्यात वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल सुरू आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांचे ट्विट चर्चेत आहे. अमेरिकेत एका संशोधकाने हवेवरती पोट भरणार मशीन तयार केलं असून, ते लवकरच भारतात उपलब्ध होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. (Petrol Diesel price hike News)

इंधन दरवाढीवरून आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील वाढत्या महागाईवर त्यांनी उपरोधिक भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील डिझेल, पेट्रोल, गॅस, फळभाज्या, कडधान्य व खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या दरांचा चढता आलेख बघून अमेरिकेतील एका वैज्ञानिकाने हवेवरती पोट भरणाऱ्या मशीन्सचा शोध लावला आहे. भारतीय बाजारपेठेत लवकरच ती उपलब्ध करण्याची घोषणा त्याने न्यूयॉर्क मध्ये केली आहे.

सुमारे चार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मागील 10 दिवसांत 9 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 6.40 रुपयांनी महागले आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 101.81 रुपये झाला असून, डिझेलचा दर 93.07 रुपये आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 84 पैसे वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत डिझेलच्या दराने पुन्हा शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 116.72 रुपये आणि डिझेलचा दर 100.94 रुपये आहे. आगामी काळात टप्प्याटप्प्याने पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे 12 ते 25 रुपयांपर्यंत वाढ होईल, असा इशारा विश्लेषकांनी दिला आहे.

रशियाने युक्रेनवर पुकारलेल्या युद्धाचे चटके आता सगळ्यांनाच बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या भावाचा भडका उडाला आहे. खनिज तेलाचा भाव आता प्रतिबॅरल 110 डॉलरवर गेला आहे. यामुळे पेट्रोलियम कंपन्यांना दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. असे असतानाही उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या काळात पेट्रोल, डिझेलचे दर सुमारे चार महिने स्थिर होते. या निवडणुकांच्या निकालानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या दरात आता वाढ सुरू झाली आहे. याआधी सीएनजीचा दरात सातत्याने वाढ करण्यात आली असून, यानंतर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरचा नंबर लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT