kranti redkar, nawab malik sarkarnama
मुंबई

मलिक अन् दाऊदचा फोटो क्रांती रेडकरच्या हाती...!

नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप केले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मलिकांकडून वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव नव्हे तर दाऊद असल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबतचे अनेक कथित पुरावेही त्यांनी दिले आहेत. उच्च न्यायालयातही त्यांनी हे पुरावे सादर केले आहेत. समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख करत मलिकांकडून सतत त्यांना डिवचले जात आहे.

दररोज सकाळी ट्विट करून मलिक वानखेडेंवर आरोप करतात. पण मंगळवारी मलिकांनी वानखेडे कुटुंबाचीच फिरकी घेतली. सकाळी मलिकांनी कॅप्टन जॅक स्पॅरो नावाची एक व्यक्ती आणि वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकर यांच्यातील ट्विटवर झालेल्या कथित संवादाचे स्क्रीनशॉट ट्विटरवर टाकले. 'ओह...माय गॉड' म्हणत मलिकांनी सुरूवातीला हे काहीतरी गंभीर प्रकरण असल्याचं सूचित केलं.

या संवादामध्ये संबंधित व्यक्तीकडून क्रांती रेडकर यांना आपल्याकडे मलिक यांचे दाऊदशी कनेक्शनचे पुरावे असल्याचे सांगत आहे. त्यावर क्रांतीने कोणते पुरावे आहेत, असा प्रश्न विचारला. त्या व्यक्तीने दोघांचा फोटो असल्याचं उत्तर दिलं. कृपया, पाठव, तुला बक्षिस मिळेल, अशी विनंती क्रांतीनं केल्याचे संवादात दिसते. पहिल्या ट्विटमध्ये एवढाच संवाद टाकत मलिकांनी उत्सुकता वाढवली.

पण तासाभराने मलिकांनी दुसरं ट्विट केलं अन् नेमका खुलासा झाला. या ट्विटमध्ये टाकलेल्या स्क्रीनशॉटमध्ये संबंधित व्यक्तीने क्रांतीला राज बब्बर आणि मलिकांचा फोटो पाठवल्याचे दिसते. त्यावर क्रांती रागाने हा तर राज बब्बर असल्याचे सांगते. होय, पण राज बब्बर यांची पत्नीही त्यांना प्रेमाने दाऊद म्हणून हाक मारते, असं ती व्यक्ती म्हणते. इथे दोघांमधील संवाद संपतो. हा विनोद असल्याचा खुलासा मलिकांनी स्वत:च केला आहे. आपल्याला सकाळी हे मिळाले, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाकडून मलिकांना दिलासा मिळाला आहे. ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात मानहानीचा दावा केला आहे. तसेच मलिकांना वानखेडे कुटुंबाविषयी कोणतेही ट्विट करण्यास मनाई करण्याची मागणीही त्यांनी केली होती. पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT