Devendra Fadnavis and Nawab Malik sarkarnama
मुंबई

देवेंद्रजी, उघडा डोळे बघा नीट..! नवाब मलिकांचा टोमणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजप (BJP) नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री तुम्ही नसून, उद्धव ठाकरे आहेत, अशी आठवणही त्यांनी करून दिली आहे.

नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस माननीय उद्धव ठाकरेजी यांना मुख्यमंत्री मानायला तयार नाहीत. कारण ते आत्ता पण स्वतःला मुख्यमंत्री मानत आहेत.देवेंद्रजी, उघडा डोळे बघा नीट, स्वप्नं बघायचं बंद करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी आहेत तुम्ही नाही.

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज मुंबईत झाली. या वेळी बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेला धारेवर धरले. ते म्हणाले की, आपले जे जुने मित्र होते ते स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणारे होते. ते आता अजान स्पर्धा घेऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray) जनाब बाळासाहेब ठाकरे लिहित असतील तर त्यांचे त्यांना लखलाभ आहे. त्यांना मुंबई महापालिकेची (BMC) चिंता आहे. परंतु, त्यांनीही माहिती आहे की अमराठी आणि मराठी हे दोघेही त्यांना मत देणार नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन ते बाळासाहेबांना जनाब म्हणत असतील तर त्यांचे त्यांना लखलाभ आहे.

खरेतर मोदीजींनी विकासाचा मुद्दा हाती घेऊन सर्वसमावेशक राजकारण केले. आम्ही लांगुलचालन करणार नाही आणि व्होटबँकेचे राजकारण करणार नाही. देशविरोधी ताकदीशी आम्ही कधीही हातमिळवणी करणार नाही. निवडणुका हरलो तरी चालेल पण आम्ही त्यांच्या विरोधातच राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

सध्या काही लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्हीवर बसून नॅरेटिव्ह सेट करतात. फ्रान्समधील एक खूप फेमस खटला आहे. मॉरिस कोंबड्याचा हा खटला होता. हा कोंबडा रोज सकाळी बांग द्यायचा. त्याचे खूप कौतुक व्हायचे. परंतु, नंतर तो दुपारी बांग देऊ लागला. हे प्रकरण अखेर न्यायालयात गेले. आताही सकाळी बांग देणारे काही लोक दिवसभर टीव्हीवर बांग देऊ लागले आहेत. त्यांच्याकडे फारसे लक्ष देण्याची गरज नाही, असे फडणवीस म्हणाले.

गरुडावर कावळा बसतो आणि त्याला चोच मारतो. गरुड काहीही करीत नाही. तो पंख पसरतो आणि आकाशात झेप घेतो. गरुड अशा उंचीवर जातो की कावळ्याला श्वासच घेता येत नाही अखेर तो खाली पडतो. भाजप हा गरुडासारखा आहे. कितीही डोमकावळे आपल्या मानेवर बसले आणि चोची मारल्या तरी चिंता करण्याचे कारण नाही. या सगळ्या डोमकावळ्यांना पुरून उरणार आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT