MP Prafull Patel
MP Prafull Patel Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर; मुंबईतील घर जप्त?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते व खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांचे मुंबईतील घर ईडीने (ED) जप्त केल्याची माहिती मिळत आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), आणि पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचा तिसरा नेता ईडीच्या फेऱ्यात अडकला असल्याची चर्चा आहे. पटेल यांचे सीजे हॅाऊसमधील घर जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात २०२१ मध्ये पटेल यांची चौकशी झाली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई आहे. या सीजे हॅाऊसमध्ये पटेल यांची गुंतवणूक असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॅाऊसच्या मागे प्रफुल्ल पटेल यांचे घर आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणात ईडी विविध धागेदोरे जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबईत इक्बाल मिर्ची व त्याच्या कुटुंबीयांच्या पाच मालमत्ता असल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यातील दोन मालमत्ता मेसर्स सनब्लिंग रिऍल्टर्स आणि मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. यांना विकण्यात आल्या आहे. वरळीतील मालमत्ता 2011 मध्ये सनब्लिंग रिऍल्टर्सला विकण्यात आली होती. मिर्ची व मिलेनियम डेव्हलपर्स यांनी संयुक्तपणे सीजे हाऊस ही 15 मजल्यांची इमारत 2007 मध्ये बांधली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील 14 हजार चौरस फुटांची मालमत्ता 2007 मध्ये मिरची कुटुंबीयांच्या नावावर करण्यात आली.

वरळीतील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा लाभ मिर्चीच्या कुटुंबीयांना मिळाला. सीजे हाऊस या मालमत्तेची कागदोपत्री खरेदी-विक्री दाखवत काळा पैसा व्यवहारात आणून पांढरा करण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. त्यासाठी चेन्नईतील एका बॅंकेत बनावट खाते उघडण्यात आले. त्या खात्यातून ही रक्कम फिरवण्यात आली. या सर्व मालमत्ता बेनामी असल्यामुळे यापूर्वी टाच आणणे शक्‍य झाले नाही. सीजे हाऊसशी संबंधित मिलेनियम डेव्हलपर्स ही कंपनी पटेल यांच्याशी निगडित असल्याचा आरोप आहे.

सनब्लिंकच्या व्यवहारात महत्त्वाचा होता. लंडनमध्ये झालेल्या बैठक मर्चंटने आयोजीत केली होती. त्या व्यवहारात त्याला पाच कोटी रुपये मिळाले होते. त्याच्या राष्ट्रीयकृत बॅंकेच्या खात्यात ही रक्कम जमा झाली होती. ही रक्कम मिर्चीच्या वतीने स्वीकारल्याचे ईडीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील एक प्रमुख आरोपी असलेल्या इक्‍बाल मोहम्मद मेमन ऊर्फ इक्‍बाल मिर्ची याला 1994 मध्ये तडीपार करण्यात आले होते.

दाऊद इब्राहिम टोळीचा अमली पदार्थांचा व्यवसाय सांभाळणाऱ्या मिर्चीला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीस जारी केली होती. अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात 1988 पासून मुंबई पोलिसांना हव्या असलेल्या मिर्चीने 1995 मध्ये भारतातून पलायन केले. भायखळा येथे त्याच्या कुटुंबीयांचा मिर्ची विकण्याचा व्यवसाय होता. त्यामुळेच त्याला गुन्हेगारी जगतात "मिर्ची' हे टोपणनाव मिळाले. प्रामुख्याने मॅण्ड्रेक्‍स गोळ्यांच्या तस्करीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मिर्चीने दुबईत साम्राज्य निर्माण केले होते. 14 ऑगस्ट 2013 रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT