Dada Bhuse
Dada Bhuse Sarkarnama
मुंबई

Assembly Session : शरद पवारांचे नाव घेताच अख्खी राष्ट्रवादी दादा भुसेंवर तुटून पडली....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या आरोपाला विधानसभेत उत्तर देताना मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी ‘भाकरी मातोश्रीचा खातात आणि चाकरी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांची करतात’ असा उल्लेख केला. पवारांचे नाव घेताच अख्खी राष्ट्रवादी भुसेंवर तुटून पडली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दादा भुसे काही आक्षेपार्ह बोलले असतील तर ते शब्द पटलावरून काढून टाकण्यात येतील, असे सांगितल्याने वाद निवळला. (NCP MLA aggressive against Dada Bhuse)

दादा भुसे म्हणाले की, महागद्दार संजय राऊत यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे. पण जगातील कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करावी. त्या चौकशीत जर मी दोषी आढळलो तर आमदारकीचा, मंत्रीपदाचाच नव्हे तर राजकारणातूनही मी निवृत्त होईल. मात्र, चौकशीत खोटं आढळून आलं तर हे महागद्दार जे आम्हाला नेहमी गद्दार गद्दार म्हणता. आमच्या मतावर निवडून आलेल्या या महागद्दारानेही राज्यसभेच्या खासदारकी, सामना दैनिकाच्या संपादकपदाचा राजीनामा द्यावा. हे भाकरी मातोश्रीचा खातात आणि चाकरी राष्ट्रवादाची, शरद पवारांची करतात आणि हे आम्हाला शिकवतात. येत्या २६ तारखेपर्यंत त्यांनी मालेगावच्या जनतेची माफी मागितली नाही तर शिवसैनिक त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत.

दरम्यान, दादा भुसे यांनी शरद पवारांचे नाव घेताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अजित पवार संतप्त झाले. अजित पवार म्हणाले की, दादा भुसेंनी जे काही मांडायचे आहे ते त्यांनी मांडावे. पण, आमचे नेते शरद पवारांचा उल्लेख करण्याचे काहीच कारण नव्हते. अधिवेशनात आम्ही सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे. पण, पवारांचे नाव घेण्याचे काहीच कारण नव्हते. भुसे यांनी आपले शब्द मागे घ्यावे, दिलगिरी व्यक्त करावी; नाही तर आम्हाला सभात्याग करावा लागला.

त्यावर मंत्री भुसे म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल मी काहीही अपशब्द वापरलेले नाहीत. फक्त त्यांची चाकरी करतात, असं म्हटलंले आहे. पण, मी पवारांविषयी चुकीचं बोललो असेल तर तुम्ही तपासून घेऊन योग्य तो निर्णय घ्या, अशी भूमिका घेतली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनीही दादा भुसे यांची बाजू सांभाळली. त्यानंतर कामकाज सुरळित सुरू झाले.

संजय राऊतांनी काय आरोप केले होते?

हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्याविरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा ॲग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स त्यांनी शेतकऱ्यांकडून गोळा केले. पण, कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स केवळ ४७ सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच स्फोट होईल, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी भुसे यांच्यावर केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT