Devendra Fadnavis, Rohit Pawar
Devendra Fadnavis, Rohit Pawar Sarkkarnama
मुंबई

'राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होतेय'

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एकापाठोपाठ एक असे १४ ट्विट करत थेट राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीका केली होती. त्यानतंर आता राष्ट्रवादीचे जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) फडणवीसांनी केलेल्या टीकेला ट्विटरच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे, अशा शब्दात रोहित पवारांनी विरोधकांवर टीका केली आहे.

रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, 'राज्यात हातातून सत्ता गेल्याने विरोधकांची प्रमाणापेक्षा अधिक तडफड होताना दिसतेय. म्हणून संदर्भ लपवून ठेवत अर्धवट माहिती देऊन लोकांचा बुद्धिभेद करण्याचा व बेछूट आरोप करून ६ दशकं संसदीय राजकारणाच्या माध्यमातून लोकसेवा करणाऱ्या पवार साहेबांना बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. सत्तेच्या लालसेपायी पवार साहेबांना बदनाम करण्यासाठी सामाजिक तणाव निर्माण करून नागरिकांनी कष्टाने उभ्या केलेल्या घरांना आग लावण्यास आणि माणसांचा जीव घेण्यासही अशा प्रवृत्तीचे लोक मागंपुढं पाहणार नाहीत. पण विरोधकांकडून इतर राज्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या या अमानवी प्रकाराला छत्रपती शिवराय आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र कधीही थारा देणार नाही! शिवाय राज्यातील माँ जिजाऊ, सावित्रीमाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या लेकीही तसं होऊ देणार नाहीत', अशा शब्दात रोहित पवारांनी विरोधकांना सुनावले आहे.

दरम्यान, 'द काश्मीर फाईल' या चित्रपटावर पवारांनी व्यक्त केलेले मत आणि त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत आपल्याला आजिबात आश्चर्य नाही. किंबहुना, ते राष्ट्रवादीच्या तुष्टीकरण धोरण आणि जातीय आधारावर राजकारणासह समाजाचे ध्रुवीकरण करतात, असा आरोप फडणवीसांनी केला होता. याबरोबरच मंत्री नवाब मलिकांवरील कारवाईनंतर पवार काय म्हणाले होते? याचबरोबर अन्य आरोप पवापरांवर फडणवीसांनी केले होते. यावर आता रोहित पवारांनी भाजप आणि फडणवीसांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT