MNS, Amol Kolhe, Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Amol Kolhe : बहि‍णींचं झालं पण लाडक्या दाजींचं काय? कोल्हेंचा सवाल तर मनसेने भावांसाठी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

Mukhyamantri Ladki bahin Yojana : महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 8 July : महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारने विधानसभेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

शिवाय सरकारने लाडक्या बहिणीसाठी योजना आणली, मात्र बहि‍णींच्या भावांचं काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील बहि‍णींप्रमाणे भावांसाठीही काही योजना सुरु करा, असा सल्ला सरकारला दिला होता. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील या योजनेवरुन सरकारला डिवचलं आहे. (Mukhyamantri Ladki bahin Yojana)

या योजनेवर बोलताना अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, "सरकारने ' मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना आणून महिला भगिनींना दरमहा 1500 हजार रुपये देण्याची घोषणा केली ही चांगली बाब आहे. मात्र, त्याच बहिणीचे म्हणणे आहे की, लाडकी बहीण म्हणून जेवढं देता तेवढंच आमच्या दाजींच्या शेतीमालाला, दुधाला भाव द्या. तसेच ताई-दाजींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सवलत द्यावी." अशा शब्दात कोल्हे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

तसंच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुधाला भाव कमी असल्याचं कोल्हे यांनी म्हटलं आहे. गुजरात, केरळमध्ये दुधाला 40 रुपये तर कर्नाटकात दुधाला 35 रुपये दर आणि सरसकट 5 रुपये अनुदान आहे. मात्र, महाराष्ट्रात दुधाला फक्त 25 ते 27 रुपये दर असल्याचं कोल्हेंनी सांगितलं. ते शिरुर शहरातील पंचायत वाडा येथे बोलत होते.

एकीकडे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी पुरुषांमध्ये काही प्रमाणात नाराजी आहे. अशातच आता पुरुषांच्या भावनेला मनसेने आवाज दिला आहे. सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मदतीचा हात दिला तसाच वाहन चालक भावालाही मदतीचा हात द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

याच संदर्भात चेंबूर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण (MNS) वाहतूक सेनेकडून बॅनर लावून ही मागणी केली आहे. या बॅनरद्वारे त्यांनी वाहन चालकांच्या दंडाच्या रक्कम माफ करण्याबाबतची मागणी केली आहे. मागील काही महिन्यात वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात ईचलन दंड आकारण्यात आला आहे.

ती रक्कम वाहनचालक भरू शकत नाहीत. त्यामुळे इतर राज्यात वाहन चालकांच्या दंडाची रक्कम माफ करून तिथल्या सरकारने वाहन चालकांना दिलासा दिला आहे. मग असं महाराष्ट्रात का होऊ शकत नाही? असा प्रश्न मनसेनं बॅनरच्या माध्यमातून विचारला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारला लाडक्या भावांच्या नाराजीला सामोरं जावं लागतं की काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT