Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Devendra Fadnavis, Eknath Shinde:  Sarkarnama
मुंबई

Cabinet Expansion : शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी? 'यांच्या'साठी मार्ग होणार खडतर...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यातील सत्तांतराला या महिन्यात वर्ष पूर्ण होत आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला मिळत असलेल्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन सत्ताधारी पक्षाच्या नेतेमंडळीमध्येही नाराजी असल्याची चर्चा आहे. तसेच याच मुद्द्यांवरुन विरोधकांकडून देखील सातत्यानं या सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. पण आता लवकरच शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी(दि.४ जून ) दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या रखडेलल्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंत्रिपदासाठी देव पाण्यात ठेवून बसलेल्या भाजप शिवसेनेतील नेतेमंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, याचवेळी या मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्याची धाकधूक देखील वाढली आहे.

दिल्ली दौऱ्यावेळी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीत दोन्ही नेत्यांनी राज्यातील कॅबिनेट विस्तारावर चर्चा झाली. यात शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं तसेच तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या सूचना शाह यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.

यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी शिंदे फडणवीसांना मंत्रिमंडळ विस्तारावेळी भाजप शिवसेनेतील वाचाळवीरांना मंत्रिपदापासून दूर ठेवा असंही म्हटलं आहे. याचसोबत सध्याच्या मंत्रिमंडळातील आळशी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवा अशी सूचनाही शाह यांनी शिंदे फडणवीसांना दिल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुकांसह सध्याच्या मंत्र्यांचंही टेन्शन वाढलं आहे.

जवळपास वर्षभरापासून तारीख पे तारीख मिळत असलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला कुठेतरी मुहूर्त मिळाला असतानाच आता इच्छुकांना मंत्रिपद मिळणार की लाल दिव्याचं स्वप्न हे स्वप्नंच राहणार हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या बैठकीत अमित शाह यांच्याकडे घरी किंवा बंगल्यावर बसून नाही तर फिल्डवर ऊतरून काम करणारे नेते कॅबिनेटमध्ये घ्यायला हवेत अशी भावना व्यक्त केल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेनेच्या वर्धापन दिनाआधी म्हणजेच १९ जून पूर्वी करण्याची विनंती मुख्यमंत्री शिंदेंनी अमित शाहांकडे केल्याचं समोर येत आहे.

..म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याचा विरोधकांचा दावा

मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde fadnavis government)दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर रखडल्यानं शिंदे गटातील आमदारांमध्ये दिवसेंदिवस खदखद व नाराजी वाढत चालली आहे. दरम्यान, शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपद मिळेल या आशेने शिंदे गटात आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होईल उद्या होईल सांगितलं जात आहे. मात्र, हा विस्तार काही होताना दिसत नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि त्यात स्थान नाही मिळालं तर आमदार नाराज होतील म्हणून हा विस्तार केला जात नाही का? असं सांगितलं जात आहे.

मंत्रिपदाच्या शर्यतीत कोण..?

भाजप(BJP)मध्ये मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये राम शिंदे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रवीण दरेकर, योगेश सागर, गणेश नाईक, विनय कोरे, जयकुमार गोरे तर महिलांमध्ये मनीषा चौधरी, मंदा म्हात्रे, देवयानी फरांदे ही नावे चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाट, भरत गोगावले, राजेंद्र यड्रावकर, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर,अनिल बाबर, चिमणराव पाटील, सदा सरवणकर, यामिनी जाधव, प्रकाश आबिटकर आदी मंडळी इच्छुक आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT