Antilia Case  Sarkarnama
मुंबई

'एनआयए'ला धक्का! अँटिलिया प्रकरणातील क्रमांक दोनच्या आरोपीला जामीन

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली मोटार सापडली होती.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया (Antilia) या निवासस्थानाजवळ स्फोटके भरलेली मोटार सापडल्याप्रकरणी बुकी नरेश गौर (Naresh Gaur) याला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. यामुळे एनआयएला धक्का बसला आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हत्या प्रकरणातही गौर आरोपी आहे. या दोन्ही प्रकरणात बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) हा मुख्य आरोपी आहे.

गौर याच्या वतीने वकील अनिकेत निकम यांनी विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला होता. गौर हा निष्पाप असून, त्याला या प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. त्याने सचिन वाझेला सिम कार्ड मिळवून दिले एवढाच त्याचा सहभाग या प्रकरणात आहे. त्याचा या प्रकरणाशी काहाही संबंध नाही. केवळ शक्याशक्यतेच्या आधारावर आरोपी घटनास्थळी होता, असे दाखवण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गौरने केवळ सिम कार्ड दिले म्हणून त्याला कटाचा भाग ठरवता येणार नाही. हे सिम कार्ड कोणत्या कारणासाठी वापरले जाणार हे त्याला माहिती नव्हते. अँटिलिया बाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार ठेवली जाईल अथवा मनसुख हिरेनची हत्या होईल, या दोन्ही गोष्टी त्याला माहिती नव्हत्या. या प्रकरणात एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रातही गौरला कटाची माहिती असल्याचा उल्लेख नाही, असेही म्हणणे गौरच्या वकिलांनी मांडले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानासमोर एक एसयूव्ही 25 फेब्रुवारीला बेवारस सापडली होती. त्यात स्फोटके आढळली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. यामुळे विरोधी पक्षांनी राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना लक्ष्य केले होते. नंतर या प्रकरणात सचिन वाझे याचे नाव समोर आले होते. त्यानंतर 5 मार्चला मनसुख हिरेन हा व्यापारी ठाण्यातील खाडीत 5 मार्चला मृतावस्थेत सापडला होता. अँटिलिया समोर सोडलेली एसयूव्ही हिरेन याच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले होते. अखेर या प्रकरणातही वाझेचे नाव पुढे आले होते. या दोन्ही प्रकरणात गौर हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे.

दरम्यान, वाझे याला मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नुकतेच बडतर्फ केले आहे. अँटिलिया आणि हिरेन हत्या प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई पोलिसांची नाहक बदनामी झाली. असे कार्य अशोभनीय असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर बडतर्फीची कारवाई झाली होती. तो सध्या कारागृहात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT