Sameer Wankhede 
मुंबई

समीर वानखेडे म्हणतात, ती तर आईची इच्छा!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याकडून सातत्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर टीका केली जात आहे. खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा दावा त्यांनी केला आहे. वानखेडे यांनी धर्मांतर केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यावर समीर वानखेडे यांच्यासह त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनीही नवाब मलिकांवर पलटवार केला आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर यांचा 'निकाहनामा' खरा असल्याचेही कबूल केले आहे. मलिकांनी सार्वजनिक केलेल्या निकाहनाम्याविषयी बोलताना ते म्हणाले, निकाहनामा उर्दूमध्ये आहे. मला उर्दू वाचता येत नाही. इंग्रजीतील सही मात्र खरी आहे. हा निकाह झाला आहे. पण काही कारणांनी त्यांनी घटस्फोट घेतला. हे त्यांचं खासगी आयुष्य आहे. नवाब मलिकांनी कुणाच्याही खासगी आयुष्यात डोकावू नये. हे अत्यंत चुकीचे आहे. याविरोधात मी न्यायालयातही जाऊ शकतो.

तर समीर वानखेडे यांनी आपला विवाह मुस्लिम पध्दतीने व्हावा, अशी आईची इच्छा होती, असा दावा केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी जन्माने हिंदू असून दलित कुटूंबातील आहे. मी आजही हिंदू आहे. मी कधीही धर्मांतर केलेले नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून त्याचा मला अभिमान आहे. माझे वडिल हिंदू आहेत तर आई मुस्लिम होती. माझं दोघांवरही प्रेम करतो.

माझं लग्न मुस्लिम पध्दतीने व्हावं, अशी आईची इच्छा होती. त्याच महिन्यात माझ्या लग्नाची नोंदणी विशेष विवाह कायद्यांतर्गत केली. कारण जेव्हा दोन वेगळ्या धर्मातील लोक लग्न करतात, त्यावेळी या कायद्यांतर्गत नोंदणी होते. त्यानंतर आम्ही कायदेशीर घटस्फोट घेतला. मी जर धर्मांतर केले असेल तर मलिकांनी तसे प्रमाणपत्र दाखवावे, पुरावा दाखवावा. माझे वडील विशेष कायद्यांतर्गत नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवतील, असंही वानखेडे यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या पहिल्या विवाहाचे प्रमाणपत्र म्हणजेच निकाहनामा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी सार्वजनिक केला. तसेच लग्नावेळी ते मुस्लिम होते, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मलिक विरूध्द वानखेडे संघर्ष वाढला आहे. त्यावर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत मलिकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT