Notification of 23 villages to be included in city of Pune
Notification of 23 villages to be included in city of Pune 
मुंबई

मोठी बातमी : पुणे झालं मुंबईपेक्षा मोठं शहर; तेवीस गावांची अधिसूचना जारी

सरकारनामा ब्युरो

पुणे : पुणे महापालिकेत 23 गावांच्या समावेशावर उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी शिक्कामोर्तब केल्यानंतर आज अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळं आता पुणे शहर मुंबईपेक्षा मोठं शहर झालं आहे. तेवीस गावांच्या समावेशामुळं पुणे शहराचं क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटर झालं आहे. तर मुंबईचं क्षेत्रफळ 460 चौरस किलोमीटर एवढं आहे. (Notification of 23 villages to be included in city of Pune)

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला ग्राम विकासमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह पुणे शहरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पुणे महापालिकेची सत्ता हस्तगत करण्यासाठी राष्ट्रवादीकडून एकाचवेळी सर्व गावांचा समावेश करण्याचा आग्रह धरण्यात येत होता. प्रस्तावित 23 गावांचा राजकीयदृष्ट्या विचार केला तर राष्ट्रवादीचा प्रभाव असलेली ही गावे असल्याने महापालिकेत पक्षाला सत्ता स्थापन करणे सहज शक्‍य असल्याचे बोलले जात आहे. 

बैठकीत अजित पवार यांनी महापालिकेतील 23 गावांच्या समावेशाबाबत शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गावांच्या समावेशाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शासनाचे उप सचिव सतीश मोघे यांच्या सहीने ही अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यामुळं पुणे महापालिकेची हद्द वाढली असून आता पुणे शहर मुंबईपेक्षा मोठं बनलं आहे. सध्या मुंबई शहराचं क्षेत्रफळ 460 चौरस किलोमीटर एवढं आहे. तर 23 गावांच्या समावेशामुळं पुण्याचं क्षेत्रफळ 516 चौरस किलोमीटरपर्यंत वाढलं आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी काल या गावांमधील सर्व शासकीय आस्थापना पुणे महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत निर्णय झाल्याची माहिती दिली होती. राज्य शासनाच्या सर्व विभागांनी त्याला संमती दिली आहे. कालच्या बैठकीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत या सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळं अधिसूचनेची केवळ औपचारिकता बाकी होती. आज अधिसूचनेनंतर 23 गावे अधिकृतपणे पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झाली.

राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यामुळं यश

२३ गावांचा महानगरपालिकेत समावेश व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर अजितदादांच्या पुढाकारामुळे हा निर्णय झाला आहे. आता बाणेर, बालेवाडी यांसारख्या महापालिकेत नव्याने आलेल्या भागाप्रमाणेच या २३ गावांचाही विकास होईल, यात काही शंका नाही. यापूर्वी राज्यात व महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असताना ज्याप्रकारे पुणे शहराचा चौफेर विकास करण्यास प्राधान्य देण्यात आले होते, ती विकासाची साखळी यापुढेही कायम राहणार आहे. सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतर महापालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेल. गेल्या साडेचार वर्षांपासून शहराच्या विकासाला जी खीळ बसली आहे, ती नक्कीच महापालिका निवडणुकीनंतर दूर होईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला. 

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेली गावे पुढीलप्रमाणे :
1. बावधन बुद्रुक
2. किरकिटवाडी
3. पिसोळी
4. कोंढवे - धावडे
5. कोपरे
6. नांदेड
7. खडकवासला
8. मांजरी बुद्रुक
9. नऱ्हे
10. होळकरवाडी
11. औताडे-हांडेवाडी
12. वडाची वाडी
13. शेवाळेवाडी
14. नांदोशी
15. सणसनगर
16. मांगडेवाडी
17. भिलारेवाडी
18. गुजर निंबाळकरवाडी
19. जांभुळवाडी
20. कोलेवाडी
21. वाघोली
22. म्हाळुंगे
23 सूस

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT