Pravin Darekar, Devendra Fadnavis and Chandrakant Patil , Devendra Fadnavis Latest News in Marathi, Latest Political News in Marathi
Pravin Darekar, Devendra Fadnavis and Chandrakant Patil , Devendra Fadnavis Latest News in Marathi, Latest Political News in Marathi Sarkarnama
मुंबई

दरेकर अन् चंद्रकांतदादांना तोडगा निघेना! अखेर फडणवीसच हाती घेणार सूत्रे

सरकारनामा ब्युरो

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीला तोंडावर भाजपमधील (BJP) अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. मिरा-भाईंदरची जबाबदारी देण्यात आलेले विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्याकडे देण्यात आली आहे. ही गटबाजी संपवण्याचे दोन वेळा प्रयत्न करुनही दरेकरांना त्यात यश आलेले नाही. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी इशारा देऊनही गटबाजी थांबलेली नाही. आता या गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सूत्रे हाती घेणार आहेत. (Devendra Fadnavis Latest News in Marathi)

फडणवीसांनी या गटबाजीवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेण्याचे नक्की केले होते; मात्र फडणवीस यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ही बैठक झाली नाही. याच काळात मिरा-भाईंदरची जबाबदारी दरेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या दुफळीवर ते यशस्वी तोडगा काढतील, अशी आशा कार्यकर्त्यांना होती. त्यानुसार संबंधितांशी दोनवेळा चर्चा केल्याचे खुद्द दरेकर यांनीच सांगितले आहे. परंतु त्यांनाही हा वाद मिटवण्यात यश आलेले नाही. गटबाजी संपुष्टात आणण्यास दरेकर आणि चंद्रकांत पाटील अपयशी ठरल्याने फडणवीस यांनाच हस्तक्षेप करावा लागेल, असे चित्र आहे.

मिरा-भाईंदर महापालिकेची मुदत ऑगस्टमध्ये संपुष्टात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ऑगस्टनंतर कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. भाजपला महापालिकेतील सत्ता टिकवायची असेल तर गटबाजीवर तोडगा काढण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा भाजपला आगामी निवडणुकीत त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी भावना पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

मिरा-भाईंदरमधील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच झाला. या मेळाव्याला प्रवीण दरेकरांनी हजेरी लावली होती. मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपचे सध्या ६० नगरसेवक आहेत. यातील फक्त १० ते १२ नगरसेवकच मेळाव्याला उपस्थित होते. या मेळाव्यावर माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह त्यांच्या गटातील बहुतांश नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे भाजपमधील गटबाजी कायम असल्याचे उघड झाले आहे.

रवी व्यास यांना पक्षाचे जिल्हाध्यक्ष मानण्यास मेहता गटाने नकार दिला आहे. त्यामुळे व्यास यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे मेहता गट पाठ फिरवाताना दिसत आहे. प्रवीण दरेकरांनी आतापर्यंत दोन वेळा हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांनी चर्चा केली होती. नंतर त्यांनी मेहतांशी संपर्क साधून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही या चर्चेतून काहीच निष्पन्न झालेले नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यालाही नरेंद्र मेहता यांच्यासह त्यांच्या गटाच्या नगरसेवकांनी दांडी मारली होती. याची दखल घेत पाटील यांनी मेहता यांचे नाव न घेता इशारा दिला होता. प्रदेशाध्यक्षांनी इशारा देऊनही मेहता गटाने व्यास यांना सहकार्य न करण्याचे धोरण सुरूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते आशिष शेलारही कार्यक्रमानिमित्त भाईंदरमध्ये आले होते. त्यावेळीही गटबाजी उफाळून आल्याचे दिसले होते. या नेत्यांच्या भांडणात कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT