मुंबई : राज्यातील भाजपच्या नेत्यांचा आत्मविश्वास भलताच वाढला आहे. त्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऑपरेशन गुवाहटीमध्ये आघाडीवर असलेले मोहीत कंबोज (Mohit Kamboj) यांनी पुन्हा इशारे देणे सुरू केले आहे. राष्ट्रवादीचा (NCP) एक मोठा मोठा नेता लवकरच अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासोबत आर्थर रोड जेलमध्ये असेल, असे ट्विट त्यांनी केले आहे.
मोहीत कंबोज आणि विरोधातील इतर नेत्यांचे युद्ध गेली अडीच वर्षे दिसून आले. पण कंबोज यांच्याशी पंगा घेतलेल्या काहींना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. माजी मंत्री नवाब मलिक हे त्यातील एक नाव. संजय राऊत आणि कंबोज यांचीही खडाखडी झाली होती. त्यातील राऊतही आता तुरुंगात आहेत.
कंबोज यांनी पुन्हा एकदा इशारा देऊन राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. हा मोठा नेता कोण, यावर आता चर्चा झडत आहेत. मी केलेले ट्विट जपून ठेवा, असेही सांगण्यास कंबोज यांनी कमी केलेले नाही.
याबाबत आपण लवकरच पत्रकार परिषद घेणार असून या नेत्याचे कारनामे उघड करणार आहोत. यात देश आणि विदेशालील मालमत्तांची यादी, बेनामी कंपन्यांची नावे, मैत्रीणींच्या नावे घेतलेल्या मालमत्ता, विविध खात्यांचा कारभार सांभाळताना केलेला भ्रष्टाचार, कुटुंबाचे उत्पन्न आणि मालमत्तांची यादी असे जाहीर करणार आहे, असे कंबोज यांनी ट्विट करून सांगितले आहे. त्यांच्या या ट्विटखाली मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
कंबोज यांनी पुन्हा तिसरे ट्विट करून राष्ट्रवादीच्या अडचणी वाढविण्याचे काम केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन प्रमुख परमबीरसिंग यांनी 2019 मध्ये सिंचन घोटाळ्याचा तपास बंद केला होता. या प्रकरणाची चौकशी पुन्हा करावी, अशी मागणी कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.