मुंबई : राजस्थान, गुजरात, कर्नाटक, दिल्लीमध्ये ओमिक्रॉनचे (Omicron Variant) रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मुंबईतही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये राज्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर आता धारावीचा परिसरही ओमिक्रॉनच्या छायेत आला आहे. टांझानिया येथून आलेला एक प्रवासी ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे सरकारसह प्रशासन दक्ष झाले आहे.
टांझानियामधून हा प्रवासी 4 डिसेंबरला परतला होता. या प्रवाशाला 7 हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा स्वॅब जिनोम सिक्वेसिंग चाचणीकरता कस्तुरबा गांधी रुग्णालयातील प्रयोगशाळेत पाठवला होता. अखेर या चाचणीचा अहवाल मिळाला आहे. हा रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळला आहे. या रुग्णाला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. त्याने कोरोना लशीचा एकही डोस घेतलेला नाही. त्याला विमानतळावर नेण्यासाठी आलेल्या दोन कुटुंबीयांचीही चाचणी करण्यात आली आहे, त्यांचे अहवाल लवकरच मिळणार आहेत.
ओमिक्रॉनचा (Omicron) राज्यातील पहिला रुग्ण कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत सापडला होता. हा रुग्ण 33 वर्षांचा अभियंता होता. त्याचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला घरी सोडण्यात आले असले तरी विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. हा रुग्ण नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतून दुबई मार्गे आला होता. तो अभियंता असून तो एप्रिलपासून एका व्यापारी जहाजावर गेला होता. त्यामुळे त्याचे कोरोना लसीकरण झालेले नव्हते.
डोंबिवलीतील रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्याला सात दिवस घरीच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे या रुग्णाला 8 डिसेंबरला रुग्णालयातून सोडण्यात आले आणि त्याच दिवशी त्याचा वाढदिवस होता, अशी माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.