कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) सत्तारूढ गटातून विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्यासह तब्बल 12 विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. चार विद्यमान संचालक फुटल्याने त्यांच्या जागेसह अन्य पाच नव्या चेहऱ्यांना सत्तारूढ गटाने उमेदवारी दिली आहे.
माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या स्नूषा व अमल महाडीक यांच्या पत्नी सौ. शौमिका, माजी मंत्री भरमू पाटील यांचे पुत्र व विद्यमान संचालक दिपक पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान संचालिका सौ. अनुराधा पाटील-सरूडकर, माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र विद्यमान संचालक अंबरिश घाटगे, ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांचे पुत्र चेतन अशा राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यातील व्यक्तींना उमदेवारी देत सत्तारूढ गटानेही काही प्रमाणात का असेना घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे.
सत्तारूढ गटाने तब्बल सहा नव्या चेहऱ्यांना संधी देताना गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, धनाजी देसाई, रविश उदयसिंह पाटील-कौलवकर, प्रताप पाटील-कावणेकर, राजाराम भाटले, रणजित बाजीराव पाटील या सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
गेल्या निवडणुकीत कमी मतांनी पराभूत झालेले माजी अध्यक्ष कै. राजकुमार हत्तरकी यांचे पुत्र सदानंद यांना पुन्हा एकदा नशीब अजमावण्याची संधी सत्तारूढ गटाने दिली आहे. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडीक, अरूण नरके, माजी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार अमल महाडीक यांच्यासह उमेदवारांच्या उपस्थितीत या नावांची घोषणा करण्यात आली.
महाडीक कुटुंबिय पहिल्यांदाच रिंगणात
गेली अनेक वर्षे "गोकुळ' च्या सत्तारूढ गटाचे नेतृत्त्व माजी आमदार महादेवराव महाडीक करतात, पण आतापर्यंत त्यांच्या घरातील व्यक्ती संघाच्या निवडणुकीत कधी उमेदवार नव्हती. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व श्री. महाडीक यांच्या स्नूषा सौ. शौमिका अमल महाडीक यांच्या रूपाने पहिल्यांदाच महाडीक कुटुंबातील सदस्य या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.