Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Assembly Session News: शेतकरीप्रश्नावर विधानसभेत प्रचंड गोंधळ; गदारोळातच मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विरोधकांचा सभात्याग

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ आमदार छगन भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अवकाळी पाऊस आणि कांदा खरेदीवरून विरोधक आज प्रचंड आक्रमक झाले होते. शेतकऱ्यांना मदत करा; अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा या वेळी विरोधकांनी दिल्या. (Opposition Aggressive in Legislative Assembly over Farmer Question; CM Shinde's big announcement in chaos)

दरम्यान, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचानामे होताच मदत करण्यात येईल, तसेच, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे मदत करणार आहोत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गदारोळातच केली. विरोधकांच्या गदारोळताच कामकाज रेटण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकून सभात्याग केला.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना तातडीने दिले आहेत. सभागृहाची जी भावना आहे, तीच सरकारची भावना आहे. त्याचवेळी भुजबळ बोलत होते. त्यावेळी भुजबळसाहेब, मी बोलतो, त्यानंतर तुम्ही बोला. एवढी घाई करू नका, शेतकऱ्यांना पैसे देतोय, आपण, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर समानधान न झाल्याने विरोधक गोंधळ करत होते. त्यावर मुख्यमंत्री चिडले आणि तुम्ही ऐकणार की फक्त राजकारण करणार आहात तुम्ही, असा सवाल केला.

शेतकऱ्यांना मदत करायची, ही जशी विरोधी पक्षाची भूमिका आहे, तशीच ती सरकारची आहे. यापूर्वी नियम, निकष बाजूला ठेवून मदत केली आहे. सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत दिली. दोन हेक्टरची मर्यादा वाढवून तीन हेक्टर केली. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत, पंचनामे जसे पूर्ण होतील, तशी मदत नुकसानग्रस्तांना देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण शेतकऱ्यांना मदत देणारच आहोत. शेतकऱ्यांना मदत करायची की सभागृहात नुसता गोंधळ घालायाचा, याचा विचार आपण करा, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले. राजकारण न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कांदा खरेदीचा प्रश्न उपस्थित केला. राज्यात कुठेही कांदा, हरभरा खरेदी सुरू झालेली नाही. तेच आम्ही सरकारच्या लक्षात आणून दिले जाईल. नाफेडकडून खरेदी सुरू झालेलीच नाही, असा अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाफेडकडून कांदा खरेदी सुरू झाली आहे, असे स्पष्ट केले. मी सगळीकडे खरेदी सुरू झाली आहे, असे म्हणणार नाही, पण काही ठिकाणी सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्यावर समाधान न झाल्याने भुजबळ हे बोलत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कांदा उत्पादकांना क्विंटलला मदत करणार आहोत, असे सांगितले. आम्ही शेतकऱ्यांना १२ हजार कोटींची मदत केली. तुमच्यासारखं शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली नाहीत. नियमित कर्ज फेडणारऱ्यांना पन्नास हजार रुपये देतो सांगितले, पण दिले नाहीत. शेवटी ते आम्ही दिले. कांदा उत्पादकांना क्विंटलमागे मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT