Bjp Leader Pankaja Munde News, Marathwada Sarkarnama
मुंबई

Pankaja Munde News: निर्णय घेण्याच्या तयारीत असलेल्या पंकजाताईंना राष्ट्रवादीकडून पुन्हा ऑफर; तर त्यांचं स्वागत करू...

BJP News : राष्ट्रवादीत येत असतील तर त्यांचं स्वागत करू...

Mangesh Mahale

Mumbai : जीएसटी आयुक्तालयाकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या बीड येथील साखर कारखान्याला नोटीस आल्याने त्या भडकल्या आहेत. या कारवाईमुळे पंकजाताई पुन्हा भाजपवर नाराज असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. "ईश्वर करो, मला कोणताही निर्णय घेण्याची वेळच येऊ नये," असे विधान पंकजाताईंनी केले आहे. त्या अस्वस्थ असल्याचे दिसते. अशातच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली आहे.

एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना पंकजाताईंनी सूचक वक्तव्य केले. त्या म्हणाल्या, "माझ्याविषयी कुणीही अफवा पसरवू नये. जेव्हा मला एखादा निर्णय घ्यायचा असेल, ईश्वर करो, असा कोणताही निर्णय घेण्याची वेळच येऊ नये, कारण संघटनेशी आपले एक बंधन असते. आपण नकळत एकमेकांना वचन, आणाभाका व शब्द दिले असतात. आपण विचारधारेवर प्रेम केले असते. त्यामुळे असा निर्णय कुणावर घेण्याची वेळ येणे अत्यंत वेदनादायी असते," त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात विविध तर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे.

"पंकजाताईंवर भाजपने सातत्याने दुजाभाव केल्याचे चित्र 2014 पासून आपण बघतो आहे. राज्यातल्या एका मोठ्या नेत्याच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्राचे जनतेला आस्था आहे. भाजपत महिलांना काय स्थान दिले जाते, किती प्रोत्साहन दिले, हे यावरून दिसते. पंकजाताई तर काही भूमिका घेत असतील, तर त्याचा विचार भाजपने केला पाहिजे. त्या राष्ट्रवादीत येत असतील तर त्यांचं स्वागत करू," असे तपासे म्हणाले.

"मी या संघटनेत माझ्या वडिलांना पाहिले आहे. माझ्यासाठी हे वेगळे नाते आहे. त्यामुळे माझ्यासाठी असा निर्णय घेणे प्रचंड वेदनादायी असेल. त्यामुळे माझ्यावर असा कोणताही निर्णय घेण्याची वेळ येऊ नये अशी माझी प्रार्थना आहे," असे पंकजा मुंडे यांनी मुलाखतीत म्हटले आहे.

माझाच कारखाना का वगळला?

पंकजा मुंडे यांच्या बीड येथील साखर कारखान्याला जीएसटी आयुक्तालयाकडून नोटीस आली आहे. सरकारकडे सात-आठ साखर कारखान्यांना मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामध्ये आपल्याही कारखान्याचं नाव होतं. पण माझा कारखाना सोडून इतर सर्व कारखान्यांना मदत केली. माझाच कारखाना का वगळला? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे अस्वस्थ असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

देशमुख, कडू यांच्याकडूनही सल्ला

राष्ट्रवादीचे नेते, आमदार अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना मोठा सल्ला दिला आहे. पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचाच पक्ष अन्याय करतोय. भाजपला मोठं करण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. आता त्यांच्याच कन्येवर पक्षाच्या माध्यमातून अन्याय केला जातोय, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी योग्य तो विचार करावा आणि योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्ला अनिल देशमुख यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. पंकजा मुंडे यांच्या शिवशक्ती यात्रेमुळेच त्यांच्या कारखान्याला नोटीस आली असावी, अशी शंका प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे, तर आता आणखी एका नेत्याने पंकजा मुंडे यांना मोलाचा सल्ला दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT