Param Bir Singh and Sachin Waze  Sarkarnama
मुंबई

परमबीरसिंहांचा पाय खोलात! वाझेसोबतची भेट पडणार महागात

परमबीरसिंह यांनी सचिन वाझे याची भेट घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करुन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) अडचणीत आले आहेत. आता त्यांनी बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याची भेट घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून, या प्रकरणी चौकशी करण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

परमबीरसिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर देशमुख यांच्या वकिलांनी परमबीरसिंह आणि वाझे यांच्या भेटीची माहिती दिली. त्यावर समितीने ही भेट आपल्यासमोर झाली नसल्याचे स्पष्ट करीत आक्षेप घेण्यास नकार दिला. मात्र, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी पुढाकार घेतला आहे.

अशी झाली भेट

परमबीरसिंह हे गृहरक्षक दलाचे महासंचालक आहेत. आज पहिल्यांदाच ते दक्षिण मुंबईतील होमगार्ड ऑफिसमध्ये आले. रजेवरुन परतल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारलेला नाही. ते त्यांच्या कक्षात गेले होते. दरम्यान, चांदीवाल समितीचे कार्यालय याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर आहे, तर गृहरक्षक कार्यालयाचे कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे. समितीसमोर हजर राहण्यापूर्वी आज परमबीरसिंह आणि वाझे एकमेकांसमोर आले. त्यावेळी या दोघांमध्ये काही काळ संवाद झाला. त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले ते कळू शकले नाही. तब्बल आठ महिन्यांनंतर परमबीरसिंह आणि वाझे समोरासमोर आले होते.

परमबीरसिंह हे आज 11 वाजता चौकशीसाठी समितीसमोर हजर झाले. ते आज पहिल्यांदाच चौकशी समितीसमोर हजर झाले. त्यावेळी त्यांनी त्यांच्या वकिलामार्फत प्रतिज्ञापत्र सादर केले. समितीसमोर सादर करण्यास माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच, कुठल्या साक्षीदाराची उलटतपासणीही मला करायची नाही, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यामुळे परमबीरसिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपातून अधिकृतरीत्या माघार घेतल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे अप्रत्यक्षपणे देशमुखांना क्लिनचिटच मिळाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

परमबीरसिंह हे समितीसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ करीत होते. त्यांनी वकिलांच्या मार्फतही समितीला हजर राहू शकत नसल्याची माहिती दिली होती. देशमुखांवर केलेले आरोप ऐकीव माहितीच्या आधारे केल्याने समितीसमोर येण्याचा काही उपयोग नाही, अशी भूमिका त्यांच्या वकिलांनी घेतली होती. या प्रकरणी प्रतिज्ञापत्राद्वारे सविस्तर बाजू मांडण्याचीही तयारी त्यांनी दाखवली होती. अखेर समितीने परमबीरसिंह यांना चौकशीला हजर राहावे, यासाठी समन्स बजावले होते. त्यांना 29 नोव्हेंबरला चौकशीस हजर राहण्यास बजावण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT