uday samant.jpg sarkarnama
मुंबई

Uday Samant : वैमानिकाच्या 'उद्योगा'चा मंत्र्यांना फटका! 'टेक ऑफ'ला नकार अन् उदय सामंत गेले कारने; नेमकं घडलं काय?

Uday Samant : उदय सामंत हे तीन शहरांच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यानिमित्त एक एअर क्राफ्ट नेमण्यात आलं होतं. मात्र, एअर क्राफ्टच्या वैमानिकानं मुजोरपणा केल्यानं सामंत यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

Akshay Sabale

उद्योगमंत्री उदय सामंत यांना वेगळ्याच मनस्तापाला सामोरे जावे लागलं आहे. शुक्रवारी नागपूर आणि अमरावती दौरा आटपून उदय सामंत हे अमरावतीच्या बेलोरा विमातळावर छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी पोहोचले. मात्र, वैमानिकानं विमान टेक ऑफ करण्यास नकार दिला. वैमानिकाच्या माजुर्डेपणामुळे मंत्री सामंत यांना समृद्धी महामार्गानं कारद्वारे छत्रपती संभाजीनगरला जावं लागलं. हे प्रकरण पोलिसांकडे गेले असून तपास सुरू झाला आहे.

मंत्री सामंत ( Uday Samant ) हे उद्योगभरारी कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. सामंत यांच्या दौऱ्यासाठी मुंबईतील एका एअर कंपनीचे एअरक्रॉफ्ट नेमण्यात आलं होतं. नागपूरहून कार्यक्रम झाल्यानंतर सामंत हे अमरावतीला पोहोचले. छत्रपती संभाजीनगर येथे 6 वाजता उद्योगभरारी कार्यक्रम होता. त्यामुळे अमरावतीत कार्यक्रम आटोपल्यानंतर सामंत दुपारी 4.30 वाजता अमरावतीच्या बेलोरा विमानतळावर पोहोचले.

6 वाजता कार्यक्रम असल्यानं 5 वाजता टेकऑफ करणे आवश्यक होते. पण, मंत्री सामंत हे विमानात बसताना वैमानिक गगन अरोरा यांनी कुठलीही सूचना न देता त्यांचे साहित्य विमानातून बाहेर काढले.

आपल्याला छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रमासाठी पोहोचणे आवश्यक असून टेक ऑफ करावे, अशी विनंती मंत्री सामंत यांनी वैमानिकाला केली. मात्र, काही नियम सांगत वैमानिकानं 'टेक ऑफ' करण्यास स्पष्ट नकार दिला. यानंतर मंत्री सामंत यांनी थेट एअर कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला. परंतु, मालकानं कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

अखेर सामंत यांनी कारनं समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगर गाठले. तसेच, शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता विमानानं मंत्र्यांशिवाय विमान टेक ऑफ केले, असं सांगितलं जातं. याप्रकरणी शिवसेनेनं ( शिंदे गट ) पोलिसांत तक्रार दिली आहे. याची दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

अमरावतीचे शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख अरूण पडोळे यांनी कंपनीचे मालक आणि वैमानिकाचं वर्तन संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे. "याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी. उद्योगमंत्र्यांच्या नियोजित कार्यक्रमात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दिली आहे," असं अरूण पडोळे यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT