Narendra Modi and Rahul Gandhi  Sarkarnama
मुंबई

Modi Guarantee : पंतप्रधान मोदींचा 'तो' शब्द काँग्रेससाठी पण ठरतोय 'गॅरंटी'चा

Sachin Deshpande

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असून, गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'मोदी की गॅरंटी' हा शब्द वारंवार भाषणात वापरत आहेत. काँग्रेसलादेखील 'गॅरंटी' शब्दाची भुरळ पडल्याचे चित्र आहे. संपूर्ण लोकसभा निवडणूक ही 'गॅरंटी' या शब्दाच्या आजूबाजूला केंद्रित राहू शकते. भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्ताने धुळ्यात काँग्रेस पक्षाने पाच 'गॅरंटी' जाहीर केल्या. यातील तीन 'गॅरंटी' यापूर्वीच जाहीर केलेल्या आहेत. आज धुळ्यातील महिला न्याय हक्क परिषदेच्या निमित्ताने नारी शक्तीसाठी पाच 'गॅरंटी' जाहीर करण्यात आल्या आहेत. महिला न्याय 'गॅरंटी' अंतर्गत देशात महिलांसाठी एक अजेंडा तयार केला जात आहे. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने 5 घोषणा केल्या असून, यात ‘महालक्ष्मी गॅरंटी’, ‘अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क’, ‘शक्ती का सम्मान’, ‘अधिकार मैत्री’ व ‘सावित्रिबाई फुले महिला वसतिगृह’ या पाच महिला 'गॅरंटी' काँग्रेस पक्ष देत असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीर केले.

भारत जोडो न्याय यात्रेच्या महिला हक्क न्याय परिषदेला ॲानलाइन संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी महालक्ष्मी 'गॅरंटी'अंतर्गत देशातील सर्व गरीब महिलांना दरवर्षी 1 लाख रुपयांची मदत दिली जाईल. अर्ध्या लोकसंख्येला पूर्ण हक्क, अंतर्गत केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये 50 टक्के हिस्सा महिलांना दिला जाईल. शक्ती का सम्मान, अंतर्गत अंगणवाड़ी सेविका, आशा सेविका आणि माध्यान्न भोजन योजनेतील कर्मचाऱ्यांचे वेतनात केंद्र सरकारचा हिस्सा दुप्पट केला जाईल. अधिकार मैत्री, अंतर्गत महिलांना त्यांच्या न्याय हक्कांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी व मदतीसाठी प्रत्येक पंचायतीमध्ये कायदे सल्लागाराची नियुक्ती केली जाईल आणि सावित्रीबाई फुले वसतिगृह अंतर्गत देशातील प्रत्येक जिल्ह्यात महिला वसतिगृह बांधले जाईल. याआधी काँग्रेस पक्षाने शेतकरी न्याय, युवा न्याय व भागीदारी न्याय संदर्भातील गॅरंटी जाहीर केल्या आहेत. काँग्रेस पक्षाच्या 'गॅरंटी' पोकळ वा जुमले नसतात तर त्या काळ्या दगडावरील रेघ असतात. आमच्या विरोधकांचा जन्मही झाला नव्हता तेव्हा 1926 पासून जाहीरनामे बनवतो व त्यातील घोषणा पूर्णही करतो. काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि लोकशाही व संविधान वाचवण्याच्या या लढाईत आमचे हात बळकट करा, असे आवाहनही मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिला हक्क न्याय परिषदेला संबोधित करताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धूमधडाक्यात महिला आरक्षण जाहीर केले, जल्लोषही केला, परंतु हे आरक्षण सर्व्हे केल्यानंतर लागू होईल म्हणजे 10 वर्षांनंतर, परंतु काँग्रेस पक्षाचे सरकार आले तर महिला आरक्षण तत्काळ लागू केले जाईल. विधानसभा, लोकसभेसह सर्व ठिकाणी महिलांची भागीदारी वाढली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. महालक्ष्मी योजनेचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार आहे. नरेंद्र मोदी देशातील अरबपतींना 16 लाख कोटी रुपये माफ करतात पण काँग्रेस पक्ष महिलांना मदत करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम करत आहे. महिला न्याय 'गॅरंटी' हे देशाच्या इतिहासात क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना, तसेच आर्थिक सर्वे करून प्रत्येक विभागात महिला, दलित, अल्पसंख्याक, मागास समाजाची किती भागीदारी आहे हे तपासणार आहे. काँग्रेसने हरित क्रांती, धवल क्रांती, संगणक क्रांती करून इतिहास घडवला आणि आता जातनिहाय जनगणना करून जेवढी लोकसंख्या तेवढी भागीदारी हे सूत्र अमलात आणणार आहे. यूपीए सरकार असताना 400 रुपयांचा गॅस सिलिंडर नरेंद्र मोदींना महाग वाटत होता, पण त्यांच्या सरकारने तो 900 रुपये केला तरीही त्यांना तो महाग वाटत नाही. हिंदुस्थानचे सरकार 90 लोकं चालवतात. त्यात दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मागास समाजाचे लोक अत्यल्प आहेत. सर्व क्षेत्रात या समाज घटकांचे प्रतिनिधित्व कमी आहे आणि हेच चित्र काँग्रेस पक्षाला बदलवायचे असून, ज्या समाजाची जेवढी लोकसंख्या तेवढा त्यांचा भागीदारी हे सूत्र लागू करायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा या वेळी म्हणल्या की, काँग्रेस पक्षाने महिलांसाठी नेहमीच काम केले आहे. मॅटरनिटी लिव्ह, हुंडाविरोधी कायदा, कन्या भ्रूणहत्याविरोधी कायदा, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिला अत्याचाराविरोधातील कायदा असे अनेक कायदे करून महिला सक्षमीकरणाची पावले उचलली आहेत. महिला सक्षमीकरण करून त्यांना त्यांचे हक्क देण्याचे काम काँग्रेस करत आहे. आज जाहीर केलेल्या महिला न्याय गॅरंटीचा फायदा देशातील कोट्यवधी महिलांना होणार असून, अलका लांबा यांनी महिला न्याय 'गॅरंटी' जाहीर केल्याबद्दल काँग्रेसच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले. या महिला हक्क न्याय हक्क परिषदेला प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, AICC सचिव सोनल पटेल, हर्षवर्धन सपकाळ, खासदार रजनी पाटील, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोशल मीडियाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, आमदार शिरिष चौधरी, आमदार अमित झनक, भावना जैन, धुळे काँग्रेस अध्यक्ष शाम सनेर यांच्यासह हजारो महिला उपस्थित होत्या. सकाळी दोंडाईचापासून भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली त्यांनतर धुळ्यातील क्रांती स्मारकाला भेट देऊन राहुल गांधी यांनी अभिवादन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर महिला न्याय हक्क परिषदेला संबोधित केले दुपारनंतर यात्रेचा पुढचा प्रवास सुरू झाला, मालेगाव येथे जाहीर सभा आणि मालेगाव येथे यात्रेचा मुक्काम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मोदी की गॅरंटी' हा शब्द लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचलित केला आहे. भाजप 'मोदी की गॅरंटी' या नावानेच मते मागणार असून, लोकसभा निवडणुकीत कुठल्या पक्षाच्या 'गॅरंटी' या शब्दाला मतदार किती महत्त्व देतात हे पाहण्यासारखे ठरेल.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT