Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

राज्यसभा निवडणुकीची धामधूम : कोरोना रुग्णांची वाढ, मतदानाचं काय होणार?

आमदाराचं एकत्र राहणं काळजी वाढणारं ठरणार नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : राज्यसभा निवडणुकीसाठी (rajya sabha election) आमदारांच्या मतांची बेरीज सुरू असतानाच भाजप आणि महाविकास आघाडीची चिंता वाढली आहे. त्यात कोरोनानं (coronavirus) डोक वर काढलं आहे. त्यामुळे सध्या आघाडी आणि भाजपसमोर दुहेरी संकट उभं ठाकलं आहे.

१० जून रोजी राज्यसभेची निवडणूक होत आहे. राज्यसभा निवडणुकीची धामधूम असतानाच कोरोना वाढू लागल्याने मतदानावर काही मर्यादा येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुढील काही दिवसांत कोरोना आणखी पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. कोरोनाच्या सावटाखाली राज्यसभा निवडणुकीसाठी येणाऱ्या आमदारांची टेस्ट करावी लागणार का, याकडे प्रशासनाचे लक्ष लागलं आहे. मुंबईत सध्या ४ हजार सक्रिय रुग्ण आहेत.

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याचं निदान झाल्यानंतर अनेक आमदारांची चिंता वाढली आहे. देवेंद्र फडणवीस मागील दोन तीन दिवसांपासून दौऱ्यावर होते. त्यांनी पनवेल, पुणे, लातूर या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांना फडणवीस उपस्थित होते.शुक्रवारी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला गेले होते. याबैठकीला छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई, चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

अपक्ष आमदारांना स्वतःच्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. राज्यात राजकीय भेटीगाठी वाढल्या असून, मतं फुटू नये म्हणून राजकीय पक्षांकडून आमदारांना एका ठिकाणी ठेवण्यात येत आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला चार दिवस बाकी असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आणि समर्थक आमदारांची बैठक बोलावली आहे.

राज्यसभा निवडणुकीमुळे दगाफटका होऊ नये, मतं फुटू नये म्हणून शिवसेनेकडून सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली होती. ८ जून ते १० जूनपर्यंत शिवसेना आमदार या हॉटेलमध्ये मुक्कामाला असणार होते.

आमदाराचं एकत्र राहणं काळजी वाढणारं..

भाजपनंही आपल्या आमदारांची राहण्याची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्येच केली आहे. भाजप आमदारही याच हॉटेलमध्ये राहणार असल्यानं शिवसेनेनं आता आमदारांची व्यवस्था दुसऱ्या हॉटेलमध्ये करणार आहे. संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. आघाडी आणि भाजप मतं फुटू नये, म्हणून आमदारांची एकत्र राहण्याची व्यवस्था करीत असल्याने कोरोनाचा धोका लक्षात घेता आमदाराचं एकत्र राहणं काळजी वाढणारं ठरणार नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

आमदार जगताप यांना आणायचे कसे?

आमदार लक्ष्मण जगताप यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले आहे. २ दिवसांपूर्वीच तब्बल ५० दिवसांच्या उपचारानंतर त्यांना पुण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांना मतदानासाठी आणायचे कसे हा प्रश्न आहे.

सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात

देशात दहा राज्यांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.देशात रविवारी 4518 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आणि केरळ आहेत. शनिवारी देशात 4270 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. गेल्या काही दिवसांमध्ये कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यामुळे महाराष्ट्राने बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणं अनिवार्य तर सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT