Congress News
Congress News  Sarkarnama
मुंबई

Congress : राजकारण तापलं; पटोले, चव्हाण, थोरात, जगतापांसह काँग्रेसचे नेते पोलिसांच्या ताब्यात

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : अदानी समुहातील आर्थिक घोटाळा प्रकरणी काँग्रेस आक्रमक झालं आहे. अदानी समुहातील आर्थिक घोटाळा उघड झाल्याचा आरोप करत केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसने आज मुंबईत धडक मोर्चा काढला.

गिरगाव चौपाटी ते राजभवनापर्यंतच्या काँग्रेसच्या या मोर्चाला सुरवात झाली. मात्र, त्यानंतर लगेच गिरगाव चौपाटी येथे पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा अडवला. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, भाई जगताप, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे आदी नेते सहभागी झाले आहेत.

काँग्रेसचा हा मोर्चा राजभवनावर जाण्याआधीच पोलिसांनी पटोले, चव्हाण, जगताप, थोरातांसह काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे काही वेळ येथे तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली.

दरम्यान, केंद्र सरकारची उद्योगपती अदानींवर विशेष मेहरबान आहे, या विशेष मेहरबानीतूनच स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसीमधील कोट्यवधी लोकांचा पैसा मनमानी पद्धतीने अदानींच्या कंपन्यात गुंतवला असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसकडून करण्यात आला.

तसेच सीबीआय आणि ईडीचा सरकारकडून दुरूपयोग करण्यात येत असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेसने केला. काँग्रेसचा मोर्चा अडवत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT