Prabhakar Sail Sarkarnama
मुंबई

'प्रभाकर साईल मृत्यू' : पत्नी पूजाचा गृहमंत्र्यांच्या भूमिकेला छेद

Prabhakar Sail | Dilip Walse Patil | Aryan Khan | : आर्यन खान प्रकरणातील पंच प्रभाकर साईलच्या मृत्यूने खळबळ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रभाकर साईल याचा शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला आहे. गतवर्षी कॉर्डालिया क्रूझ ड्रग्ज पार्टीमध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Arrested) याला अटक केल्यानंतर तत्कालिन तपास अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर खंडणीचे आरोप करुन साईल चर्चेत आला होता. मात्र साईलच्या या मृत्यूवर आज सकाळपासून अनेकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साईल याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले, साईलच्या मृत्यूमुळे संशयास्पद परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस महासंचालकांना याबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच लवकरात लवकर या मृत्यू प्रकरणाचा चौकशी अहवाल देण्याचे आदेशही वळसे-पाटील यांनी दिले आहेत. त्याचवेळी प्रभाकर साईल यांचा मृत्यूमागे घातपाताची शक्यता व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मात्र गृहमंत्री वळसे पाटील यांच्या याच भूमिकेला प्रभाकर साईलची पत्नी पूजा साईल यांनी छेद दिला आहे. आपल्या पतीचा मृत्यू हा नैसर्गिक आहे, आम्हाला काहीही शंका नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या ते स्वत: चालत गेले. त्यांचा ECG काढला गेला. डॉक्टरांनी त्यांना अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. मग ते चंद्रा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. त्यांना नंतर अटॅक आला आणि पाच मिनिटांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. आम्हाला तिथलं सीसीटीव्हीही दाखवला. त्यात सर्व दिसत आहे. आम्हाला काहीही शंका नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक आहे. तर प्रभाकर यांच्या आई हिरावती साईल यांनी अचानक घडलेली घटना काही समजण्यापलीकडची आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

कोण होता प्रभाकर साईल :

आर्यनला अटक केल्यानंतर या प्रकरणातील प्रथम पंच किरण गोसावी चर्चेत आला होता. प्रभाकर साईल हा गोसावीचा बॉडीगार्ड होता. त्याच्याकडेच प्रभाकरची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था होती. मात्र छाप्यानंतर साईल याने वानखेडे आणि गोसावी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. क्रूझवर छापा घालण्यापूर्वी किरण गोसावी आणि समीर वानखेडेंच्यात मोबाईलवरून संभाषण झाले होते. याशिवाय त्यांच्यात डील झाल्याचेही त्याने म्हटले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी मध्यस्थातर्फे २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुख खानकडे करण्यात आली होती, असा दावाही साईलने केला होता.

वानखेडे यांनी सांगितल्यानंतर आपण पंच म्हणून कोऱ्या कागदावर सही केल्याचेही साईल यांनी सांगितले होते. आपल्या जीवाला धोका असल्याने एवढे दिवस आपण गप्प होतो, असा दावा प्रभाकर साईल याने केला होता. क्रूझ पार्टीप्रकरणात पुरावे म्हणून साईलने काही फोटो आणि व्हिडीओ देखील सादर केले होते. त्यातील एका व्हिडीओमध्ये आर्यनला अटक करून एनसीबी कार्यालयात आणल्यानंतर किरण गोसावी आर्यन खानजवळ बसून त्याच्या फोनवरून कुणाशी तरी बोलणे करून देत असल्याचे दिसत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT