Prajakt Tanpure, Uday Samant Sarkarnama
मुंबई

Prajakt Tanpure Vs Uday Samant : प्राजक्त तनपुरेंचा वर्मावर घाव अन् उदय सामंतांचा पाराच चढला !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिवसेना फुटून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार गुवाहटीला गेले होते. यानंतर राज्यात सत्तांतर होऊन वर्ष झाले तरी शिंदे गटाला गुवाहटी घेरण्याची संधी विरोधातील एकही आमदार सोडत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. पावसाळी अधिवेशनात शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे प्रश्न विचारताना गुवाहटीचा मुद्दा उपस्थित केला. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत चांगलेच चिडले होते. त्यामुळे शुक्रवारी गुवाहटीचा मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण रंगताना अधिवेशनात दिसून आले. (Latest Political News)

महाविकास आघाडीच्या काळात मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी केली. ठाकरेंच्या कालवाधतील मुंबई पालिकेत पारदर्शकता होती. करप्रणालीबाबत ती पारदर्शकता पुण्यात दिसून आली नसल्याचे सांगून आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पुण्यातील २०१७ मध्ये नव्याने समाविष्ट गावांना चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या करप्रणालीचा मुद्दा उचलून धरला.

तनपुरे म्हणाले, "पुण्यात ११ गावांचा समावेश झाला पण त्या गावांना चुकीच्या पद्धतीने लागू केला होता. त्यावेळी राज्यमंत्री म्हणून संबंधित अधिकऱ्यांची बैठक घेऊन ती करप्रणाली दुरुस्त करण्यचा प्रयत्न केला. मात्र त्याच काळात आपण गुवाहटीला गेलात. त्यामुळे सचिवही रजा टाकून गेले. परिणामी दुरुस्त करप्रणालीची अंमलबजावणीही राहून गेली. त्यामुळे संबंधित ११ गावांसाठी दुरुस्त करप्रणाली पुन्हा लागू करण्याची तात्काळ कार्यवाही करणार का?"

प्रश्नात गुवाहटीचा मुद्दा उपस्थित केल्याने उत्तर देण्यासाठी उठलेले व चिडलेले मंत्री उदय सामंत यांनी आमदार तनपुरे यांचा चांगलाच समाचार घेतला. अधिवेशनात तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढत असाल तर तुमच्याही अनेक गोष्टी आम्हाला माहिती आहेत, असा इशाराही सामंत यांनी दिला.

उदय सामंत म्हणाले, "तनपुरे यांनी मांडलेल्या मुद्दा रास्त आहे, मात्र त्यांनी गुवाहटीचा मुद्दा काढायची काही गरज नव्हती. उत्तर देताना माझ्याकडून राजकारण येत नाही. तुम्ही गुवाहटीचा मुद्दा काढला म्हणून उत्तर देतो. तुम्ही वेळत अजितदादांसोबत गेला असता तर कॅबिनेट मंत्री झाला असता. येथे गुवाहाटीचा विषय काढायची काहीही गरज नव्हती."

आमच्या गुवाहटीला जाण्याने तनपुरे यांना खूप लागल्याचा टोलाही यावेळी सामंत यांनी लगावला आहे. सामंत म्हणाले, आम्हीसुद्ध २५ वर्षांपासून राजकारणात आहोत. आम्हालाही सर्वांच्या जंत्र्या माहिती आहेत. मी तुम्हाला उत्तर देताना काही राजकीय बोललो असतो तर गुवाहटीचा मुद्दा ठीक आहे. पण आम्ही गुवाहटीला गेलो हे तुमच्या किती वर्मी लागले आहे ते पाहा. रवींद्र धंगेकर यांना मदत करण्याच्या हेतून येथे मी सकारात्मक भूमिका मांडतोय. यातच तनपुरे यांना वाटत असेल की त्यांनी गुवाहटीचा मुद्दा काढून 'उरलेल्या' लोकांत ते मोठे होतील, तर तो तुमचा गैरसमज आहे. मी कधी राजकीय बोलत नाही. राजकीय बोलण्यासारखे माझ्याकडेही बरेच आहे."

तनपुरेंचा समाचार घेतल्यानंतर सामंत यांनी उपस्थित केलेल्या करप्रणालीच्या प्रश्नाला उत्तर दिले. सामंत म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेचा टॅक्स आणि अॅक्ट हे वेगवेगळे आहेत. त्याची अंमलबजावणी बाकी २७ महानगरपालिकेमध्ये करता येत नाही. नवी मुंबईबाबत हे धोरण आणण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निश्चित केले आहे. नवी मुंबईत हे धोरण आल्यानंतर इतर पालिकांमध्ये तेथील आर्थिक धोरण पाहून याची अंमलबजावणी करण्यात येईल."

(Edited Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT