Mumbai News : शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यामुळे त्यांनी बंडखोरांना पराभूत करण्यासाठी प्रचाराचा झंझावात सुरु ठेवला आहे. एकनाथ शिंदे, बंडखोर यांच्यासह भाजप,अजित पवारांवर त्यांनी टीकेची झोड उठवली आहे.
पण प्रचाराचा धुरळा सुरु असतानाच एक विदर्भात एक घटना घडली. तिची सोमवारी (ता.11) राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी विदर्भात आले असतानाच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली.यानंतर संतापलेल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपास अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ठाकरेंना चांगलेच धारेवर धरले आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला आहे.ते म्हणाले,निवडणुकीच्या काळात बॅग तपासणं हा पोलिसांचा अधिकार आहे. त्याचा इश्यू करण्यात काही अर्थ नाही. सगळ्यांच्या बॅग तपासल्या जातात. माझीही बॅग तपासली जात असते, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हॅलिकॉप्टरने सभेसाठी विदर्भातील वणी येथे आले होते.त्यावेळी हेलिपॅडवर निवडणूक अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी केली. हेलिकाॅप्टरमधील बॅगची तपासणी करताना उद्धव ठाकरेंनी व्हिडिओ काढत निवडणूक अधिकाऱ्यांनाच प्रतिप्रश्न विचारले.
आपल्या बॅगची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी त्यांचे नाव आणि ते मुळचे कुठले असल्याची विचारणा केली.त्यावेळी एका अधिकाऱ्याने तो मध्य प्रदेशचा असल्याचे सांगितले.त्यावेळी गुजरातचे नाही ना.महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातील लोकं आहेत,असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी वणी येथील सभेत पुन्हा एकदा बॅग तपासल्याचा मुद्दा काढत विरोधकांची पिसे काढली. ते म्हणाले,माझ्या बॅगा तपासल्याबद्दल आपण अधिकाऱ्यांवर रागावलो नाही.मात्र, जशी त्या अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली, त्याचप्रमाणे मोदी-शाहांचीही बॅग तपासण्याचे धाडसही दाखवायला पाहिजे.त्यांचीच नव्हे तर दाढीवाला मिंधे,गुलाबी जॅकेटवाले अजित पवार आणि टरबुजा फडणवीसांचीही बॅग तपासण्याची गरज आहे, असाही हल्ला त्यांनी चढविला.
आपण येथे प्रचाराला आल्यानंतर सात ते आठ निवडणूक अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली.मी त्यांना परवानगी दिली. मी त्यांचा व्हिडिओ काढला. पण यापुढे कुणाची बॅग तपासण्यात आली, तर प्रथम त्या अधिकाऱ्याचे ओळखपत्र तपासा, तो कुठल्या हुद्द्यावर आहे हे जाणून घ्या. जसे ते तुमचे खिसे तपासत आहेत, तसेच त्यांचेही खिसे तपासा. हा आपला अधिकार आहे, असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.