Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadik Sarkarnama
मुंबई

राज्यसभा निवडणूक चुरस वाढली : धनंजय महाडिकांना पहिला अपक्ष आमदार मिळाला

Yogesh Kute

मुंबई : माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या उमेदवारीमुळे राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha election 2022) चुरस वाढली आहे. अपक्ष आमदारांचा भाव वाढला आहे. या निवडणुकीतील मतदान हे उघड पद्धतीने होत असले तरी अपक्ष आमदार काय करणार, याच्यावर सारी गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे या अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात स्पर्धा आहे. त्यात पाच आमदार हे कोणाला टेन्शन देणार, यावर निवडणुकीचा निकाल फिरू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातही प्रकाश आवाडे यांनी आज महाडिक यांचा अर्ज भरताना उपस्थिती लावून आपला कल जाहीर केला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करतानाच महाडिकांना एक अपक्ष आमदार मिळाला आहे. (MLA Prakash Awade Supports Mahadik in Rajya Sabha election)

महाविकास आघाडीतील संजय राऊत, संजय पवार (शिवसेना), प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी) आणि इम्रान प्रतापगढी (काॅंग्रेस) या चारही उमेदवारांसाठी 168 मतांची तंतोतत गरज आहे. यापैकी तीन उमेदवारांना सुरक्षित मतांचा तंतोतंत कोटा दिला तर चौथ्या उमेदवाराला पंधरा मतांची आवश्यकता आहे. शिवसेनेकडील पाच आमदार असे आहेत की ते एकतर छोट्या पक्षाचे असून सरकारमधे सहभागी आहेत. त्यामुळे पाच मते नक्की मिळतील. पण उरलेल्या दहा अपक्षांपैकी कितीजण मतदान करतील हा प्रश्न आहे. या दहा मध्ये बहुजन विकास आघाडीेचे तीन आमदार याशिवाय संजय शिंदे, चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर ), नरेंद्र भोंडेकर यांचा कल कोणाकडे राहील, याबद्दल आता सांगता येत नाही. तर आशिष जयस्वाल आणि ऐनवेळी मंजुषा गावित आणि गीता जैन हे अपक्ष आमदार स्वयंभूपणे निर्णय घेवू शकतात.

केंद्रिय तपास यंत्रणांची धास्ती यापैकी अनेकांना आहे. याच गणितावर भाजपने तिसऱ्या उमेदवाराची खेळी खेळली आहे. एकदंर टसल जबरदस्त आहे. महाविकास आघाडी सरकारची खरी कसोटी तर आहेच. पण मतदानानंतर सरकारच्या अस्तित्वाचाही प्रश्न या निवडणूक निकालानंतर उभा राहिल की काय, असा धोका आहे.

विधानसभेत स्वतंत्रपणे निवडून आलेले 13 अपक्ष आमदार आहेत. तर 16 आमदार छोट्या छोट्या पक्षातून निवडणून आले आहेत. 13 पैकी आठ अपक्षांनी महाविकास आघाडीला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिलेला आहे. 16 पैकी 10 लहान पक्षांचाही महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. यामुळे महाविकास आघाडीकडे एकूण 170 आमदारांचे संख्याबळ आहे. मात्र सत्तास्थापनेसाठी असलेल्या 8 अपक्ष आणि 13 लहान पक्षांना राज्यसभेसाठी व्हिप लागू नसणार आहे. लहान पक्षापैकी समाजवादी ( 2), प्रहार ( 2 ) माकप (1), शेकाप (1) स्वाभिमानी (1) आणि शंकरराव गडाख यांच्या क्रांतीकारीचे एक अशा सात जणांचे महाविकास आघाडीला मतदान होईल. मात्र आठ अपक्षांसह बहुजन विकास आघाडीचे तीन अशा 11 आमदारांची भूमिका मात्र निर्णायक ठरणार आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला 42 मतांचा कोठा निश्चित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT