Mumbai, 26 December : राज्याचे नवनियुक्त परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केल्याप्रमाणे अखेर आज पनवेल ते खोपोली असा एसटी बसने प्रवास केला. या प्रवासादरम्यान सरनाईक यांनी एसटीच्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. या एसटी प्रवासामुळे प्रवाशांचा संघर्ष समजला, अशी भावनाही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.
प्रताप सरनाईक (Pratap Saranaik ) यांनी 24 डिसेंबर रोजी परिवहन मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. त्या दिवशी त्यांनी एसटी महामंडळाच्या आगाराला एसटी बसने प्रवास करूनच भेट देईन. लोकांच्या अडचणी काय आहेत, त्यांना सुविधा काय पाहिजेत, हे त्या प्रवासातून जाणून घेईन, असे जाहीर केले होते. त्यानुसार सरनाईक यांनी शब्द पाळत पनवेल ते खोपोली एसटी बसने प्रवास केला आहे.
एसटी प्रवासानंतर सरनाईक यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. ते म्हणाले पनवेल ते खोपोली एसटी बसने (ST Bus) प्रवास करताना आजचा अनुभव मनाला स्पर्शून गेला. एका साध्या प्रवासात लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या गोष्टी समजल्या. एसटी ही गाडी नसून हजारो भावनांचा प्रवास करणारा सेतू आहे. या प्रवासात अनेक प्रवाशांशी संवाद साधला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक कहाणी होती आणि त्यांच्या बोलण्यातून मला त्यांचा संघर्ष समजला.
खोपोली बस आगाराला भेट देऊन तिथल्या एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्याही समस्या समजून घेतल्या. त्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. एसटीची सेवा ही फक्त प्रवासापुरती नाही, तर ती माणसांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे, त्यामुळे एसटी प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देणे, हे आमचे कर्तव्य आहे, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
पनवेल एसटी बसस्थानकात स्वच्छता गृह सुस्थितीत नाहीत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पाणीपोई केलेली आहे, ती ठेकेदाराने पत्रा लावून बंद केलेली आहे. आरटीओने बाहेर जप्त केलेल्या गाड्या पनवेल आगारात आणून लावण्यात आलेल्या आहेत. असं होता कामा नये, हे काय डंपिंग स्टेशन आहे का? आरटीओ हाही माझाच विभाग आहे, त्यांनी दुसरी जागा बघितली पाहिजे. बाहेर पकडलेल्या गाड्या दोन ते तीन वर्षे आगारात आणून टाकताय, हे योग्य नाही, या शब्दांत पनवेल आगाराची पाहणी केल्यानंतर सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.