Pratap Sarnaik Visits Sanjay Raut Home : एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. खासदार राऊत यांच्या भांडूपमधील मैत्री निवासस्थानी ही भेट घेतली. मंत्री सरनाईक यांचे स्वागत खासदार राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी केले.
मंत्री सरनाईक यांनी राऊत यांची दिवाळी पाडव्यानिमित्त साधत ही भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाली आहे. पण ती माध्यमांना सांगणार नाही. थेट मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगणार असल्याचे सांगून, या भेटीमागील राजकीय उत्सुकता मंत्री सरनाईक यांनी वाढवली आहे.
राऊत बंधूंच्या आई यांना छोटासा अपघात झाला होता. याची माहिती मिळताच, मंत्री सरनाईक यांनी फोन करून तब्येतीची विचारणा केली होती. दिवाळीत पाडव्याला भेटीला येतो, असे सांगितले होते. त्यानुसार मंत्री सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज त्यांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊत आणि त्यांच्या मातुश्री देखील उपस्थित होते.
या भेटीविषयी राऊत (Shivsena UBT) बंधूंनी मौन बाळगले असले, तरी मंत्री सरनाईक यांनी या भेटीवर माध्यमांशी सावध संवाद साधला आहे. राऊत यांना भेटीचे कारण सांगताना, ठाकरेंची भेट घेणार का? या प्रश्नाला खुबीने टाळत, त्याची देखील मंत्री सरनाईक यांनी उत्सुकता वाढवली आहे.
प्रताप सरनाईक म्हणाले, "आईला (राऊत यांच्या आई) अपघात झाला होता. त्यात त्यांना लागलं होतं. राऊत कुटुंबियांमध्ये अशा गोष्टी घडत असतात. प्रताप सरनाईक त्यांच्याच कुटुंबाचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मला हक्काने ती (राऊत यांची आई) लाडू बनवून ठेवते. मी आलो नाही, तर सुनीलला फोन करून विचारायला सांगते, तो का आला नाही?"
या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे मंत्री सरनाईक यांनी म्हटले. ही चर्चा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे. पण माध्यमांना सांगणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. "मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे. गेले अनेक वर्षांचा लोकप्रतिनिधी आहे. गेले अनेक वर्षे काम करत असताना, त्यांच्याच नेतृत्वाखाली मला मंत्रिपद मिळाले आहे. इकडे येण्यापूर्वी, काही दिवसांपूर्वी मी त्यांना सांगितले होते की, आई पडली आहे, तिला भेटण्यासाठी मी जाणार आहे. मी काही कोणापासून लपवून ठेवत नाही. ज्या काही चर्चा झाल्या, त्यांच्या कानावर नक्कीच घालेल," असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
सरनाईक आणि राऊत कुटुंबाचा जिव्हाळा जसा आहे, तसाच शिवसेना एकत्र असताना, ठाकरे कुटुंबांशी देखील होता. यंदा दिवाळीनिमित्ताने ठाकरे कुटुंबाना भेटीचा योग आहे का? या प्रश्नावर मंत्री सरनाईक यांनी खुबीने उत्तर देत ठाकरे कुटुंबियांच्या भेटीचा मुद्दा टाळला. या प्रश्नावर मंत्री सरनाईक यांनी, अपघात घडला नसता देखील मी आलो आहे. आता दोन वर्षांनी आलो आहे. आईचा अपघात घडला होता. हे कळल्या-कळल्या मी फोन देखील केला होता. मी त्यावेळी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी नक्की येणार, आणि पाडव्याच्या दिवशीच येणार हे देखील सांगितले होते, असे उत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.