मुंबई : शहरातील नागरिकांना कामाच्या व्यापातून निवांत व्हायचे ठिकाण म्हणजे फुटाळा तलाव. शहराच्या कानाकोपऱ्यातील लोक येथे विरंगुळ्यासाठी येत असतात. येथे आता बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्प साकारला जाणार आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण गुरूवारी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत येथील सह्याद्री अतिथिगृहात करण्यात आले.
उपराजधानी नागपूरच्या फुटाळा तलावातील बुद्धिस्ट थीमपार्क मध्ये 115 फूट उंच बुद्धमूर्ती त्याखेरीज वाचनालय, अभ्यासगृह आदींचा समावेश असलेला भव्य सेंट्रल प्लाझा, साडेतीन हजार व्यक्तींसाठी खुले सभागृह तसेच मनोरंजनाच्या सोयी प्रस्तावित केल्या आहेत. त्रिशताब्दी महोत्सवाअंतर्गत विकासासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. फुटाळा तलाव (तेलंगखेडी) येथे बौद्धशिल्प उद्यान उभारण्यासाठी सन 2001 मध्ये तत्कालीन उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर या प्रकल्पाला तत्कालीन नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवजीराव मोघे यांनी मंजुरी दिल्यानंतर तेथे अंदाजे 112.57 हेक्टर जागा आरक्षित ठेवण्याचे ठरले होते.
येथील मुख्य आकर्षण असलेली 35 मीटर उंचीची बुद्धमूर्ती दोन हजार 290 चौरस मीटर जागा व्यापणार आहे. तलावाकाठी भटकण्यासाठी प्रोमनेड, पाण्यात पाय बुडवून बसण्यासाठी घाट व नौकाविहारासाठी जेटी उभारली जाईल. त्याखेरीज येथे आर्ट अँड क्राफ्ट व्हिलेज, 42 हजार 400 चौरस मीटर क्षेत्रफळात भव्य सेंट्रल प्लाझा सभागृह - वाचनालय, अभ्यासगृह तसेच प्रदर्शन हॉल असेल. उद्याने, खेळांच्या जागा, शिल्प उद्यान तसेच साडेतीन हजार प्रेक्षकांची क्षमता असलेले खुले सभागृह (अँफीथेटर), बहुद्देशीय भव्य ध्यानधारणा सभागृह, बुद्धविहार, गौतम बुद्धांच्या आयुष्यातील प्रसंगांवर आधारित भित्तीशिल्पे व भित्तिचित्रे यामुळे हे थीमपार्क अत्यंत प्रेक्षणीय होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या प्रकल्पाला अंदाजे 1000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकडे जगातील सर्व बौद्धधर्मीय राष्ट्रे आकर्षित होणार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतील व यामुळे नागपूर हे पर्यटनाचे जागतिक केंद्र तयार होणार आहे, असा विश्वास डॉ. राऊत यांनी व्यक्त केला. या अभ्यासक-पर्यटकांसाठी येथे हॉटेलही उभारले जाईल व त्यात व्याख्यानांसाठी सभागृह, राहण्यासाठी 35 खोल्या असतील. या जमिनीची मालकी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे असून ती संपादित करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहेत. या प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे केली जाईल. प्रस्तावित बौद्ध शिल्प उद्यानाचे सादरीकरण प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा यांनी केले. जागतिक बँकेचे सल्लागार रवी बनकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, पशुसंवर्धन खात्याचे प्रधान सचिव व इतर अधिकारी सादरीकरणाच्या वेळी उपस्थित होते. (Edited By : Atul Mehere)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.