मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे (Bharat Jodo)महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी राज्यातील काँग्रेस (Congress) नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. (Congress Bharat Jodo Yatra latest news)
'भारत जोडो यात्रे'च्या पार्श्वभूमीवर मुंबईतही पुढील आठवड्यात 'भारत जोडो यात्रा' काढण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवाय शेकाप, सीपीआय, सीपीएम आणि जनता दलासह काही स्वयंसेवी संस्थाही यात सहभागी होणार असल्याचे मुंबई काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत निघालेल्या या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही मुंबई काँग्रेसच्या वतीने गांधी जयंतीला रविवार, २ ऑक्टोबर रोजी या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
मुख्य म्हणजे या यात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. लवकरच याबाबत अंतिम घोषणा केली जाणार असल्याचे समजते. देशभरातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि इतर प्रश्न लक्षात घेता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबरपासून कन्याकुमारी येथून 'भारत जोडो यात्रे'ला सुरुवात केली आहे.
ऑगस्ट क्रांती मैदान ते मंत्रालयाशेजारील गांधी पुतळ्यापर्यंत ही यात्रा काढण्यात येणार आहेत. या यात्रेच्या आयोजनाबाबत नुकतीच एक बैठक मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यात मुंबई काँग्रेसतर्फे मुंबईतील अनेक सामाजिक संस्थांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार अनेक संस्थांनी यात्रेला पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.