Mumbai News: महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिवंगत ज्येष्ठ पार्श्वगायिका व आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांच्या निधनावर सभागृहात शोकप्रस्ताव सादर केला. मात्र शोकप्रस्तावाचं वाचन करताना नार्वेकर हे अनेकदा अडखळले.तसेच काही शब्दही चुकीचे उच्चारले. इतकंच नव्हे तर त्यांनी आशा भोसलेंचा जीवनप्रवास कथन करताना त्यांच्या वडिलांचं नाव 'दीनानाथ' ऐवजी 'दीनदयाल' असं घेतलं. त्यानंतर त्यांनी याच शोकप्रस्तावात 'आशा' ऐवजी 'अशा' असा उच्चार केला. यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियावरुन जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा त्यांनी त्यांच्या ठाकरे शैलीत खरपूस समाचार घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी(ता.23) सोशल मीडियावर पोस्ट करत शोकप्रस्तावातील अक्षम्य चुकांवरुन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलेच धारेवर धरले. या त्यांच्या पोस्टनंतर विरोधकांनीही नार्वेकरांवर सडकून टीका केली आहे.
राज ठाकरे त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात, पद्मविभूषण आशाताई भोसलेंच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना, विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी ज्या पद्धतीने मराठी भाषेची चिरफाड केली आणि कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही, हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी ? असा संतप्त सवालही त्यांनी नार्वेकरांना उपस्थित केला.
नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चाललं असता कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली, हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही. बरं अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर, दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते आणि वाट्टेल तसं मराठी वाचून दाखवत होते.
त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकाही आमदाराला आक्षेप नोंदवावासा वाटला नाही. नार्वेकरांना ना दीनानाथ मंगेशकर माहित आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहित आहेत,असा टोलाही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून नार्वेकरांना लगावला.
मनसे प्रमुख म्हणाले, भाजपने जी काही खोगीरभरती सुरु केली आहे, त्यात त्यांची अवस्था तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धुपाटणे अशी झाली असल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला. तसेच सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं, माहित नाही पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की त्यांच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नसल्याची खंतही राज ठाकरेंनी पोस्टमधून व्यक्त केली आहे.
राज ठाकरेंनी राहुल नार्वेकरांच्या शोक प्रस्तावाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा साधला. ते म्हणाले,यावेळी सभागृहात श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का माहित नाही, पण असते तरी मला वाटत नाही त्यांना काही फरक पडला असेल.
गुलाबी आंखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी ( स्वतः निर्माण केलेल्या बेसुरात) म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्याचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं ! पण त्यांच म्हणणं सोपं आहे, सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना बरोबर , अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना ? बस झालं, दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चौहान म्हणो काय फरक पडतो, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली.
शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या, आताच्या पिढ्या हे पाहात आहेत आणि हे रेकॉर्ड झालेले सभापतींचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही ? माणूस शिक्षित असला पाहीजे पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत का नाही ?अशी विचारणाही ठाकरेंनी पोस्टमधून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याचदरम्यान,राज ठाकरेंनी श्री. एकनाथ शिंदेंना पण याच्याशी घेणंदेणं असण्याचं काहीच कारण नाही. मराठी भाषेबद्दलच्या अभ्यासाचं त्यांचं विमान पंन्नास हजार फुटावरून चाललंय म्हणून त्यांचा पण दूर दूर पर्यंत संबंध नाही ! ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही, ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार किंवा मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला.
मनसे अध्यक्षांनी आपल्या पोस्टमधूनन लोकसभा आणि विधानसभेचा इतिहासाची ओळखही करुन दिली. ते म्हणतात, या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले जे पुढे लोकसभेचे पहिले अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशिनाथ कुंटे विधानसभेचे अध्यक्ष होते, अरुणभाई गुजराथी होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता आता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था ? कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं ते ऐकावंसं आणि बघावसं पण वाटत नाही इतकं सुमार पद्धतीने सुरु आहे.
आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरु आहे, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरु आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरु आहे याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चीड येते. काल नार्वेकरांनी आशाताईंच्या निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला आणि त्यावर एकाही सदस्याने ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू संमतीच दिली. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत.
महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोझर फिरवल्याबद्दल आणि शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेधही राज ठाकरेंनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचं पावसाळी अधिवेशन सोमवारी(ता.22) सुरु झालं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून या अधिवेशनात आशा भोसलेंना आदरांजली वाहताना एक अक्षम्य चूक घडली. अधिवेशन सुरु झालं की, यापूर्वीच्या अधिवेशनापासून ते नियोजित अधिवेशनाच्या वाहण्याची परंपरा आहे. जाते. श्रद्धांजली प्रस्ताव विधानसभेच्या पटलावर ठेवला गेला की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर दिग्गज श्रद्धांजली वाहतात ही सभागृहाची परंपरा आहे. मात्र राहुल नार्वेकर यांनी नाव वाचतानाच चूक केली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्यावर टीका होते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.