Raj Thackeray Latest News in Marathi
Raj Thackeray Latest News in Marathi  sarkarnama
मुंबई

'राज ठाकरेंना धरुन कोर्टासमोर आणा' : मुंबई पोलिसांना आदेश

सरकारनामा ब्युरो

सांगली/इस्लामपूर : राज्यात मशिदींवरील भोंगे काढण्यावरुन वातावरण तापले आहे. अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात सांगली जिल्हातील ३२ शिराळा (32 Shirala) प्रथमवर्ग न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. यात राज ठाकरे यांना धरुन कोर्टासमोर आणा असे स्पष्ट आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंना लवकरच ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. (Raj Thackeray Latest News in Marathi)

राज ठाकरे यांना बजावण्यात आलेले अजामिनपात्र वॉरंट २००८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गु्न्ह्याशी संबंधित आहे. या प्रकरणात त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान 109,117,143 आणि मुंबई पोलीस कायदा 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट बजावण्यात आले असून यात राज ठाकरे यांना धरुन कोर्टासमोर आणण्याचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत. तसेच यासाठी एका विशेष कॉन्स्टेबलची नियुक्ती कण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

काय आहे प्रकरण?

२००८ साली राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणी करत आंदोलन केले होते. या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर कल्याण न्यायालयाच्या आदेशाने अटकेची कारवाई करण्यात आली होती. या अटकेच्या निषेधार्थ शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात काही संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर बंद पुकारला होता. यात कार्यकर्त्यांनी दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.

या प्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर शिराळा प्रथमवर्ग न्यायालयात राज ठाकरे यांच्यासह १० मनसे कार्यकर्त्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र सुनावणीच्या तारखांना राज ठाकरे शिराळा न्यायालयात वारंवार गैरहजर राहत असल्याने त्यांच्याविरोधात आता अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.

आताच वॉरंट का?

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ५ ते १० वर्षांहुन अधिक काळ प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याचे काम सध्या यु्द्धपातळीवर सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून राज ठाकरे यांच्याविरोधातील हा खटला निकाली काढण्यात येणार आहे. मात्र सुनावणींच्या तारखांना राज ठाकरे सातत्याने गैरहजर राहत असल्याचा ठपका ठेवतं न्यायालयाने ६ एप्रिल २०२२ रोजी त्यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट बजावले आहे. यावर लवकरात लवकर कारवाई करत राज ठाकरे यांना न्यायालयापुढे उभे करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT