Raj Thackeray shares a viral video of a Japanese woman learning Marathi, sparking a fresh Marathi language debate involving Mohan Bhagwat. Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : जपानी मुलीचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राज ठाकरेंनी थेट मोहन भागवतांना सुनावलं; म्हणाले, "मला संघाच्याच लोकांनी सांगितलं..."

Raj Thackeray on Mohan Bhagwat : 'मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे.'

Jagdish Patil

Mumbai News, 24 Feb : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या सोशल मीडियावरवरून एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ही तरूणी मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. शिवाय ती रोज एक शिकलेला मराठी शब्द देखील बोलून दाखवत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत राज ठाकरे यांनी परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही, असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला आहे. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही? असा सवाल राज यांनी उपस्थित केला आहे.

राज ठाकरेंनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात.

ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो.

ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे.

मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं.

मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही? माहित नाही,' असं म्हणत त्यांनी मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला.

तर मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे, असो, असं म्हणत त्यांनी भागवत हे मराठी असून मराठीत संवाद साधत नसल्याकडे लक्ष वेधलं.

दरम्यान यावळी त्यांनी मराठी भाषिकांना आवाहन केलं. ते म्हणाले, परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही, त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद, असं राज यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT