Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटणार : भाजप-शिंदे गट-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता!

Raj Thackeray : आगामी निवडणूकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची सुत्रांची माहीती आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या नेत्यांची सातत्याने होणाऱ्या भेटी आणि चर्चा यामुळे मनसे-भाजप युती अशा नव्या समीकरणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज ठाकरे यांच्यातही राजकीय सलगी वाढत आहे. नुकतेच मुख्यमंत्री हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन गणेशाचं दर्शन घेतले. आता राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदेंची भेट घेणार आहेत. गणेशोत्सवाचं औचित्य साधत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार आहेत.

दरम्यान मागील अनेक दिवसांपासून भाजपा-मनसे युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर असताना भाजपा नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली होती. यामध्ये आगामी मुंबई महानगर पालिका निवडणूकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याची सुत्रांची माहीती आहे. यात मनसेसोबतच्या युतीची शक्यतांची पडताळणी घेण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध बिघडल्यानंतर भाजपाला मुंबईत नवा मित्र हवा आहे. यामुळेच राज ठाकरेंसोबत भाजप युती करण्याची दाट शक्यता आहे. राज ठाकरेंना सोबत घेतल्यास मुंबईत मराठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यास मदत होईल, अशी भाजपची योजना आहे. मुंबईत लाखोंच्या सभा घेण्याची क्षमता राज ठाकरे यांच्याकडे आहे. यामुळे भाजपला मुंबईत फायदा होण्याची शक्यता आहे.

आता राज ठाकरे- एकनाथ शिंदे- फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता, ही युती शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार आहे. मुंबई महापालिका निवडुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती होईल, शिवसेनेच्या मतांवर याचा परिणाम होईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT