Mumbai News, 13 Oct : "राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे. मला एक खून माफ करा. मला एक खून करायचा आहे", असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. ते मनसेच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने दंड थोपटले आहेत. ही निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली आहे. त्यासाठी आता त्यांच्या पक्षाने चांगलीच कंबर कसल्याचं दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर मनसेकडून (MNS) रविवारी गोरेगाव येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरेंनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर ठाकरे शैलीत निशाणा साधला. तसंच त्यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मृतींना देखील उजाळा दिला.
मात्र, या मेळाव्यात बोलताना त्यांनी मला एक खून करायचा असून तो मला माफ करा अशी विंनती थेट राष्ट्रपतींकडे केली. राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे. मला एक खून माफ करा. ज्याने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना त्याचा मला खून करायचा आहे, ते असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
तर सर्वांना फोटो देणं शक्य होत नाही लोक पुन्हा पुन्हा फोटो काढतात हे थांबलं पाहिजे असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं. ते म्हणाले, "सर्वांना फोटो देणं शक्य होत नाही. एकाने तर नाकाजवळ कॅमेरा आणला, 'मी म्हटलं नाकातील केस काढायचे आहे का फोटो?' कशासाठी फोटो? वर्धापन दिन असला तरी फोटो काढतात आणि वाढदिवस असला तरीही काढतात.
एखाद्याचा फोटो नसेल तर समजू शकतो. पण काही जण दरवर्षी फोटो काढतात. हा एक आजार आहे. या गोष्टी थांबल्या पाहिजेत. मला त्रास होतो, अनेकांना त्रास होतो, त्यामुळे मी महाराष्ट्र सैनिकांना भेटू शकलो नाही. पुढच्या वेळी जास्तीत जास्त भेटेन.", अशा शब्दात त्यांनी सतत फोटो काढणाऱ्यांवर नाराजी दर्शवली.
यावेळी त्यांनी रतन टाटांच्या निधनावर भाष्य केलं. ते म्हणाले, जगात खूप कमी व्यक्ती आहेत, ज्यांच्या आपण पाया पडावे, असे वाटते. त्यात रतन टाटा होते. मी त्यांना भेटू शकलो. त्यांच्याशी गप्पा मारु शकलो. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असं राज ठाकरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.