Thane News : लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कोकणातला गड उध्वस्त झाल्यानंतर उद्धव ठाकरेंना आता पुन्हा राजापूर विधानसभात मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार आणि उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक राजन साळवी (Rajan Salvi) यांनी शिवबंधन तोडत उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत धनुष्णबाण हाती घेतला आहे. याचवेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
ठाण्यातील आनंद मठात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार राजन साळवी यांचा गुरुवारी (ता.13) शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी साळवींसोबत कोकणातील असंख्य पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यावेळी शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण सामंत आणि अनेक शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
राजन साळवी यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.ते म्हणाले, 9 फेब्रुवारी रोजी मी एकनाथ शिंदेंना भेटलो,त्यांचे आशीर्वाद घेतले.त्यांना म्हणालो, तुमच्या कुटुंबातलं मला सदस्य करुन घ्या. हा तुमचा छोटा भाऊ पाठीमागं राहिला होता. तो आता पुन्हा तुमच्या कुटुंबात येऊ इच्छित आहे. माझ्यासोबत अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते तुमच्याकडे येऊ इच्छित असल्याचं बोलून दाखवलं.आणि हा सुवर्ण दिवस उजाडला.आनंद दिघेंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीत शिंदे साहेबांचं नेतृत्व उभं राहिल्याचं उभ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशानं पाहिल्याचंही साळवी यांनी यावेळी सांगितले.
माझ्या दोन्ही डोळ्यांत आज अश्रू आहे. एका डोळ्यात कारण गेली 38 वर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं शिवसेनेत काम करत होतो.नगरसेवक,नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख झालो.अन् 2009,2014 आणि 2019 असं आमदारही होऊ शकलो.त्यानंतर शिवसेने उपनेतेपदी भोवतो.पण आता नवीन प्रवाहामध्ये यावं लागतंय म्हणून दु:खं आहे.
तर दुसर्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत.कारण एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत कुटुंब सदस्य असतानाच माझ्यावर एक भाऊ म्हणून प्रेम केलं.तीन टर्म आमदार अगदी 2022 पर्यंत भाईंनी एक कुटुंबातला छोटा सदस्य म्हणून प्रेम केलं.मधल्या काळातही त्यांचं मार्गदर्शनही घेत होतो. पण अडीच वर्षांपूर्वी एकनाथ भाई मुख्यमंत्री होत असताना मला त्यांच्यासोबत जाता आलं नाही.याचं दु:खं असल्याचंही साळवींनी बोलून दाखवलं.
2006 साली एक पोटनिवडणूक लढवली होती.पण त्यात मी पराभूत झालो होतो. पण त्यानंतर 2009,2014 आणि 2019 आमदार राहिल्यानंतर मी 2024 च्या निवडणुकीला सामोरे गेलो.पण मला पराभवाचा सामना करावा लागला. माझा पराभव कुणामुळे झाला, याबाबतही मी बोललो.2014 साली भाजपसोबत आपली सत्ता आली.त्यावेळी मला वाटलं होतं की,माझ्यासारखा एक निष्ठावंत शिवसैनिक मंत्री होईल.मंत्रिपदासाठी स्वत:शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंकडे माझी शिफारस केली होती.पण दुर्दैवानं होऊ शकलो नाही.पण आता नाव घ्यावंच लागेल.
विनायक राऊतांनी त्यावेळी दीपक केसरकरांना मंत्रिपद दिलं.2019 ला वाटलं मंत्री होईल. कारण त्यावेळी उदय सामंत पक्षात आले, तेही मंत्री झाले.पण 2024 च्या निवडणुकीत माझा पराभव झाला, तो मान्यही केला.2006 साली जो पराभव झाला तो झाला.पण 2024 निवडणुकीत माझा जो पराभव झाला,तो माझ्या,कुटुंबाच्या माझ्या समर्थकांच्या जिव्हारी लागला.
पण ज्या विनायक राऊतांना आम्ही काम करुन खासदार केलं.त्याच विनायक राऊतांनी त्यांच्या जिल्हाप्रमुखांनी त्यावेळी किरण सामंतांचं काम केलं असा आरोपही राजन साळवी यांनी यावेळी केला. पण आता रत्नागिरी जिल्ह्यात आता शत-प्रतिशत शिवसेना करणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केल्यावर मला विधान परिषद किंवा मोठी जबाबदारी देणार असल्याचं बोललं जाऊ लागल्याचंही साळवींनी सांगितलं.
माजी आमदार राजन साळवी यावेळी मला शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळाले. मला काहीच नको. मला फक्त माझ्यासोबत राजापूर मतदारसंघातील आलेले शिवसैनिक, पदाधिकारी यांचा योग्य सन्मान व्हावा, हीच अपेक्षा आहे,अशी इच्छा व्यक्त केली. तसेच उदय सामंत पालकमंत्री आहेत. त्यांनीही मला छोटा भाऊ म्हणून सामावून घ्यावं असंही राजन साळवी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.