Uddhav Thackeray and Salman Khan
Uddhav Thackeray and Salman Khan 
मुंबई

ठाकरे सरकारच्या मदतीला सलमान खान धावून येणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र सरकारकडून (Maharashtra Government) अभिनेता सलमान खान (Salman Khan) याची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून सलमानशी चर्चाही केली जात असल्याचे समजते. मुस्लिम समाजात कोरोना लसीकरणाविषयी (Corona Vaccination) जनजागृती करण्यासाठी सलमानला साकडे घातले जाणार आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत सलमान खान ठाकरे सरकारच्या मदतीला धावून जाणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे.

देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे. जवळपास 100 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहे. एकट्या महाराष्ट्रात हा आकडा 10 कोटींहून अधिक आहे. पण मुस्लिम समाजामध्ये अद्यापही लसीकरणाविषयी जनजागृती झालेली नसल्याने या समाजातील लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. समाजातील अनेक जण लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.

यापार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाविषयी मुस्लिम समाजातील नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी सलमान खानची मदत घेतली जाणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिले आहे. सलमान खानसोबत या समाजातील धार्मिक नेत्यांचीही मदत घेतली जाणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. त्यांचा लोकांवर अधिक प्रभाव पडू शकतो, असंही टोपे म्हणाले.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या, लसीकरण होते तेव्हा मुस्लिम समाजात काही प्रमाणात त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समाजातील नागरिक लसीकरणात सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. सलमान खानसारखे अभिनेते त्यांना प्रोत्साहित करतील, असं पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, महाराष्ट्रात आतापर्यंत 10 कोटी 25 लाख डोस देण्या आलेले आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत 18 वर्षांपुढील प्रत्येकाला किमान एक डोस मिळाला, असेल अशी अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महामारीची साखळी सात महिन्यांची असते. पण लसीकरण मोठ्या प्रमाणावर झालेले असल्याने कोरोनाची तिसरी लाट अधिक तीव्र राहणार नाही, असंही टोपे यांनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT