Raju Patil News : चंद्रपूर महापालिकेत भाजपने शिवसेना ठाकरे गटाच्या पाठिंब्यावर महापौरपद मिळवत सत्ता स्थापन केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.
चंद्रपूर महापालिकेत भाजपच्या संगीता खांडेकर महापौरपदी विराजमान झाल्या, तर ठाकरेंच्या शिवसेनेला उपमहापौरपद मिळाले. पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या भाजप आणि ठाकरे गटाने सत्तेसाठी एकत्र येताच राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद, विशेषतः काँग्रेसमधील गटबाजी आणि वाटाघाटींमधील अपयश, यामुळे सत्ता हातातून गेल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.
याच पार्श्वभूमीवर राजू पाटील यांनी सोशल मीडियावर “तुमचे ते चंद्रपूर… आमचे ते डोंबिवली… वाह रे वाह!” असा टोला लगावत संजय राऊत यांना लक्ष्य केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेत मनसेने शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर राऊत यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या वेळी सत्तेसाठी तडजोड केल्याचा आरोप मनसेवर करण्यात आला होता.
मात्र आता चंद्रपूरमध्ये ठाकरे गटाने भाजपसोबत हातमिळवणी केल्यामुळे राजू पाटील यांनी पलटवार करत “तुम्ही केले ते योग्य आणि आम्ही केले ते चुकीचे का?” असा अप्रत्यक्ष सवाल उपस्थित केला आहे. ठाकरे गटाच्या निर्णयामुळे मनसेला टीकेला प्रत्युत्तर देण्याची संधी मिळाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
दरम्यान, चंद्रपूरमधील सत्तासमीकरणांमुळे राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची पुन्हा एकदा झलक पाहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेसाठी पक्षांमधील वैचारिक भिंती दुय्यम ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.