Uddhav Thackeray, Ramdas Kadam sarkarnama
मुंबई

शिवसेनेला आणखी एक हादरा; रामदास कदम यांचा 'जय महाराष्ट्र'

Ramdas Kadam Latest Marathi News : रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला (ShivSena) एक-एक धक्का बसत आहे. एकीकडे खासदार, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असतानाच शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी पत्र लिहून शिवसेनेबद्दल नाराजीही बोलून दाखवली आहे. (Ramdas Kadam Latest Marathi News)

कदम यांनी पत्रात म्हटले आहे की 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेतेपदी नियुक्ती केली होती. मात्र, बाळासाहेबांच्या निधनानंतर नेते पदाला कुठल्याही प्रकारची किंमत दिली नाही. हे मला पाहण्यास मिळाले, अशी टीका कदम यांनी केली आहे. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचे काम आपल्याकडून कधीच झाले नाही. उलटपक्षी मला आणि माझ्या मुलगा आमदार योगेश कदम याला अपमानीत करण्यात आले, असा आरोप कदम यांनी केला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीआधी मला अचानक 'मातोश्री'वर बोलावून घेतले. मला आदेश दिले की यापुढे तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले, तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. याचे कारण अजूनही मला कळू शकलेले नाही. मागील 3 वर्षांपासून तोंड दाबून बुक्क्याचा मार मी सहन करत आहे, असेही कदम म्हणाले.

विधानसभा निवडणुकीनंतर 2019 मध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसबरोबर (Congress) सरकार बनवत होतात, त्याही वेळी आपल्याला हात जोडून विनंती केली होती, बाळासाहेबांनी आयुष्यभर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष केला आणि हिंदुत्त्व टिकवल आहे. काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी करू नका, असे बाळासाहेबांचे म्हणणे होते. तेच माझेही म्हणणे होते. मात्र, आपण माझे ऐकले नाही याचे दु:ख आहे. शिवसेनाप्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती, असे सांगत कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा ठाकरेंकडे दिला आहे.

शिवसेनेचे फायर ब्रँड नेते म्हणून कदम यांच्या ओळख होती. मध्यतंरी अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवल्याचा आरोप कदम यांच्यावर झाला होता. त्यांच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या होत्या. शिंदे गट स्थापन झाल्यानंतर कदमांनी राजीनामा दिला आहे. त्यांचा मुलगा योगेश कदमही या आधीच शिंदे गटात सामील झाले आहेत. आता रामदास कदम पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT